कोअर प्रोजेक्टची कर आकारणी रद्द करा;मालमत्ता कराचा वाढता बोजा अमळनेरकरांना मान्य नाही;…….सोमचंद संदानाशिव यांचे एकजुटीने लढ्याचे आवाहन!

     अमळनेर : अमळनेर शहरातील नवीन मालमत्तांवर सुमारे दोन-अडीच वर्षांपूर्वी करण्यात आलेल्या कर आकारणीबाबत सध्या TP विभागाच्या अधिकाऱ्यांमार्फत सुनावणी सुरू आहे. या पार्श्वभूमीवर अमळनेरकर नागरिकांनी या विषयाकडे गांभीर्याने पाहून आपल्या हक्कासाठी एकजुटीने आवाज उठवावा, असे आवाहन अमळनेर नगरपरिषदेचे सेवानिवृत्त वरिष्ठ लिपिक सोमचंद संदानशिव यांनी केले आहे.

    त्यांच्या म्हणण्यानुसार, सुमारे दोन-अडीच वर्षांपूर्वी कोअर प्रोजेक्ट, अमरावती या संस्थेमार्फत निविदेच्या माध्यमातून शहरातील नवीन मालमत्तांची मोजणी करून मोठ्या प्रमाणावर कर आकारणी करण्यात आली आहे. या प्रक्रियेबाबत नागरिकांच्या मनात अनेक प्रश्न असून, सदर कर आकारणीची पद्धत, त्याचे निकष तसेच आकारण्यात आलेल्या कराची योग्यताही तपासणे आवश्यक आहे.

      सध्या सुरू असलेल्या सुनावणीमध्ये नागरिकांना कितपत सवलत मिळणार, याबाबतही संभ्रम आहे. त्यामुळे केवळ सुनावणीपुरता विषय मर्यादित न ठेवता कर आकारणीची संपूर्ण प्रक्रिया पारदर्शकपणे तपासावी, अशी मागणी नागरिकांनी करावी, असे संदानशिव यांनी म्हटले आहे.

विशेषतः कॉलनी परिसरातील अनेक भागांमध्ये अद्याप रस्ते, गटारी यांसारख्या मूलभूत सुविधांचा अभाव असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. अशा परिस्थितीत नागरिकांवर मोठ्या प्रमाणात कराचा बोजा पडत असल्यास त्याचा फेरविचार होणे गरजेचे आहे.

    ‘आज आवाज उठवला नाही, तर उद्या पश्चात्तापाची वेळ येऊ शकते’, असा इशारा देत संदानशिव यांनी अमळनेरकरांना आवाहन केले आहे की, कोअर प्रोजेक्ट, अमरावतीला देण्यात आलेल्या कामाची व निविदेची सखोल चौकशी करून आवश्यक असल्यास सदर कामाचा फेरविचार करावा. तसेच नगरपरिषदेच्या सक्षम कर्मचाऱ्यांमार्फत नव्याने मोजणी करून, पारदर्शक व नियमानुसार कर आकारणी करण्यात यावी.

     या मागणीसाठी नागरिकांची समिती स्थापन करून लोकशाही मार्गाने आंदोलन उभारण्याची गरज आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. बाह्य संस्थेला देण्यात आलेल्या कामाचा खर्च अखेरीस नागरिकांच्या पैशातूनच होणार असल्याने या संपूर्ण प्रक्रियेबाबत अमळनेरकरांनी जागरूक होऊन प्रश्न विचारण्याची वेळ आली आहे.

    “हा प्रश्न कोण्या एका व्यक्तीचा नसून शहरातील प्रत्येक करदात्या नागरिकाच्या हिताचा आहे. त्यामुळे सर्वांनी एकत्र येऊन वस्तुनिष्ठ माहिती जाणून घ्यावी आणि अन्यायकारक वाटणाऱ्या कर आकारणीविरोधात लोकशाही मार्गाने आवाज उठवावा,” असे आवाहन प्रसिद्धी माध्यमातून सोमचंद संदानशिव यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!