सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला अमळनेर तालुका महाविकास आघाडीचा जाहीर पाठिंबा; उपविभागीय अधिकाऱ्यांना दिले निवेदन

अमळनेर शहर प्रतिनिधी, नीट पेपरफुटीच्या घटना आणि विविध परीक्षांमधील कथित गैरव्यवहारांची नैतिक जबाबदारी स्वीकारून केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा, या मागणीसाठी दिल्लीतील जंतरमंतर येथे उपोषणास बसलेले शिक्षणतज्ज्ञ व सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला अमळनेर तालुका महाविकास आघाडीच्या वतीने जाहीर पाठिंबा देण्यात आला आहे. यासंदर्भात महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी अमळनेर विभागाच्या उपविभागीय अधिकारी मयुर भंगाळे यांना निवेदन देऊन आपल्या तीव्र भावना शासनापर्यंत पोहोचवण्याची विनंती केली आहे.

निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, जंतरमंतरवर अहिंसक पद्धतीने उपोषण करत असलेल्या सोनम वांगचुक यांना दिल्ली पोलिसांनी बळजबरीने उचलून सफदरजंग रुग्णालयात दाखल केले. गनिमी काव्याचा अवलंब करत केलेली ही कारवाई लोकशाहीला काळीमा फासणारी आहे. अहिंसक आंदोलकांना अशा प्रकारे हटवणे अत्यंत चुकीचे असून, केंद्र सरकारच्या या हुकूमशाही कृत्याचा महाविकास आघाडीने तीव्र शब्दांत निषेध नोंदवला आहे.

देशात सातत्याने होणारी पेपरफुटी, शिक्षणावरील वाढता खर्च आणि त्यामुळे हताश होऊन विद्यार्थ्यांकडून होणाऱ्या आत्महत्येच्या घटना हे भारताच्या भविष्याच्या दृष्टीने अत्यंत गंभीर मुद्दे आहेत. परंतु, सरकारला या विषयांचे कोणतेही गांभीर्य दिसून येत नसल्याची खंत या निवेदनात व्यक्त करण्यात आली आहे.

उपविभागीय अधिकाऱ्यांना दिलेल्या या निवेदनावर डॉ. बी. एस. पाटील, डॉ रविंद्र पाटील, चिंधू वानखेडे,डी. एम. पाटील, बी. के. सूर्यवंशी, धनगर दला पाटील, सुरेश पिरन पाटील,प्रा अशोक पाटील,अरुण बाबूराव देशमुख, संदीप बाबूराव घोरपडे, अनंत निकम, संतोष पाटील, बन्सीलाल भागवत, चंद्रशेखर भावसार, नितीन निळे यांच्यासह अमळनेर तालुका महाविकास आघाडीच्या इतर प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!