कर्तव्यावर असताना महावितरण वायरमनचा विजेच्या शॉकने दुर्दैवी मृत्यू; दोषींवर कारवाईसाठी मृतदेहासह ग्रामस्थांचा तहसीलदार कार्यालयात ठिय्या

अमळनेर : येथील भगवा चौक परिसरात वीज दुरुस्तीचे काम करत असताना अचानक वीज प्रवाह सुरू झाल्याने महावितरणचे कर्मचारी शरद गोसावी यांचा विजेचा तीव्र धक्का लागून दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेमुळे संतप्त झालेल्या नातेवाईकांनी व ग्रामस्थांनी दोषींवर तत्काळ कडक कारवाईच्या मागणीसाठी मृतदेह थेट तहसीलदार कार्यालयात आणून ठिय्या मांडल्याने परिसरात काही काळ तीव्र तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

पोलवरून खाली उतरताना घडला अपघात

मिळालेल्या माहितीनुसार, आज भगवा चौक परिसरात शरद गोसावी हे आपल्या सहकाऱ्यांसह (एकूण ५ कर्मचारी) वीजवाहिनीच्या दुरुस्तीचे काम करत होते. काम संपवून पोलवरून खाली उतरत असताना अचानक वीज प्रवाह सुरू झाल्याने गोसावी यांना विजेचा तीव्र शॉक लागला. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, शॉक लागल्यानंतर ते सुमारे ५ ते १० मिनिटे विजेच्या खांबावर लटकलेल्या स्थितीत होते. त्यानंतर ते अचानक खाली कोसळल्याने त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली.

उपस्थित नागरिकांनी त्यांना तातडीने डॉ. अनिल शिंदे यांच्या रुग्णालयात दाखल केले; परंतु उपचारादरम्यान डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

निष्काळजीपणाचा आरोप आणि नातेवाईकांचा आक्रोश

काम सुरू असताना वीजपुरवठा अचानक कसा सुरू झाला? यात महावितरणच्या कर्मचाऱ्यांचा अथवा यंत्रणेचा निष्काळजीपणा आहे का? असा सवाल उपस्थित करत संतप्त नातेवाईक आणि ग्रामस्थांनी दोषींवर गुन्हा दाखल करावा, या मागणीसाठी मृतदेह थेट अमळनेर तहसीलदार कार्यालयात आणला. प्रशासनाने दोषींवर कडक कारवाईचे आणि योग्य चौकशीचे आश्वासन दिल्यानंतरच पुढील निर्णय घेतला जाईल, असा पवित्रा ग्रामस्थांनी घेतला.

नागरिकांच्या घरातील अंधार दूर करणारा दीप मालवला

काही दिवसांपूर्वीच मुसळधार पावसात आर. के. नगर परिसरात तिरपा झालेला वीज खांब आणि रोहित्र (DP) जीवाची पर्वा न करता दुरुस्त करून परिसरातील वीजपुरवठा पूर्ववत करण्यात शरद गोसावी यांनी मोलाचे योगदान दिले होते. जनतेला अखंड सेवा देण्यासाठी सदैव तत्पर असणाऱ्या एका कर्तव्यदक्ष कर्मचाऱ्याचा असा दुर्दैवी अंत झाल्याने संपूर्ण अमळनेर शहरातून आणि महावितरण वर्तुळातून हळहळ व्यक्त केली जात आहे.

घटनेची गांभीर्याने दखल घेत महावितरण आणि पोलीस प्रशासनाकडून अधिकृत चौकशी सुरू करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!