अमळनेर : शहरातील चोपडा रोडवरील उड्डाणपुलाजवळ एक काळीज पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे. उड्डाणपुलाच्या कामासाठी करण्यात आलेल्या खोल खड्ड्यात साचलेल्या पाण्यात बुडून तीन अल्पवयीन मित्रांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेमुळे संपूर्ण अमळनेर शहरासह सिंधी कॉलनी परिसरात प्रचंड खळबळ उडाली असून सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

नेमकी घटना काय?
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, अमळनेरमधील सिंधी कॉलनी भागात राहणारे तीन अल्पवयीन मित्र दुपारी पोहण्यासाठी चोपडा रोडवरील उड्डाणपुलाजवळील पाण्याने भरलेल्या मोठ्या खड्ड्याकडे गेले होते. पाण्याचा अंदाज न आल्याने पोहताना तिघेही खोल पाण्यात बुडाले.
घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी तातडीने घटनास्थळाकडे धाव घेतली. नागरिकांनी मोठ्या शर्थीचे प्रयत्न करून तिघांनाही पाण्यातून बाहेर काढले आणि उपचारासाठी तात्काळ डॉ. अनिल शिंदे यांच्या रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉ. संदिप जोशी यांनी तपासणी अंती तिघांनाही ‘मृत’ घोषित केले. त्यानंतर पुढील प्रक्रियेसाठी आणि शवविच्छेदनासाठी मृतदेह ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पुढील तपास सुरू केला आहे.
‘सेल्फी’ नाही, तर ‘पोहतानाच’ घडली दुर्घटना; नातेवाईकांनी केला खुलासा.
सुरुवातीला ही दुर्घटना ‘सेल्फी’ काढताना घडल्याची चर्चा शहरात रंगली होती आणि तशा बातम्याही वाऱ्यासारख्या पसरल्या. मात्र, मयत मुलांच्या नातेवाईकांनी या अफवांचे खंडन केले आहे.
नातेवाईकांचे म्हणणे:
मुलांचे मोबाईल खदाणीच्या बाहेरच व्यवस्थित ठेवलेले सापडले आहेत. तसेच, त्या मोबाईलमधील व्हिडिओंवरून हे तिघे मित्र तिथे केवळ पोहण्यासाठीच गेले असल्याचे स्पष्ट होत आहे.
