एक झाड लावा, हजारो जीव वाचवा!’ प्रताप महाविद्यालयात ‘वन महोत्सव’ आणि वृक्षारोपण अभियान उत्साहात संपन्न

अमळनेर : स्थानिक खांदेश शिक्षण मंडळाचे प्रताप महाविद्यालय, अमळनेर येथे राष्ट्रीय सेवा योजना (NSS) एककातर्फे ‘वन महोत्सव’ अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आला. महाराष्ट्र शासन व कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या निर्देशानुसार १ ते ७ जुलै २०२६ या कालावधीत महाविद्यालयाच्या प्रांगणात हे विशेष वृक्षारोपण अभियान राबविण्यात आले.

कार्यक्रमाचे मार्गदर्शक व महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य डॉ. एच. डी. जाधव आणि कबचौ उमवि जळगावचे सिनेट सदस्य प्रा. डॉ. संदीप बी. नेरकर यांच्या शुभहस्ते महाविद्यालयाच्या परिसरात वृक्ष लागवड करून या महोत्सवाचा शुभारंभ करण्यात आला.

याप्रसंगी बोलताना प्र. प्राचार्य डॉ. एच. डी. जाधव यांनी वृक्षांचे महत्त्व अधोरेखित केले. ते म्हणाले की,“एक झाड लावा आणि हजारो जीव वाचवा. झाडे आपल्याला केवळ प्राणवायू, सावली आणि अन्नच देत नाहीत, तर स्वच्छ पर्यावरणही बहाल करतात. आज आपण लावलेले हे छोटेसे रोप उद्या मोठे वृक्ष बनून पुढील पिढ्यांसाठी अमूल्य ठेवा ठरेल.”

प्रदूषणमुक्त भारत घडवण्याचे सिनेट सदस्य डॉ. संदीप नेरकर यांचे आवाहन

सिनेट सदस्य डॉ. संदीप नेरकर यांनी उपस्थितांना आणि तरुणाईला आवाहन करताना सांगितले की, “फक्त वृक्ष लागवड करून चालणार नाही, तर लावलेल्या प्रत्येक झाडाचे संगोपन करणे ही आपली जबाबदारी आहे. प्रत्येकाने किमान एक झाड लावून त्याचे जतन करावे, जेणेकरून आपण एक हिरवेगार आणि प्रदूषणमुक्त भारत घडवू शकू आणि पर्यावरणाचे संरक्षण करू शकू.”

महाविद्यालयातील मान्यवरांची उपस्थिती

या पर्यावरणपूरक कार्यक्रमाला उपप्राचार्य डॉ. विजय मांटे व डॉ. योगेश तोरवणे सर, प्राध्यापक डॉ. कैलास निळे, डॉ. एस. डी. बागुल, डॉ. हेमंत पवार यांची प्रमुख उपस्थिती लाभली.

तसेच कार्यक्रम यशस्वीतेसाठी रासेयो (NSS) कार्यक्रम अधिकारी डॉ. सुनील राजपूत, सहाय्यक कार्यक्रम अधिकारी डॉ. जयेश साळवे, महिला कार्यक्रम अधिकारी डॉ. वैशाली राठोड यांच्यासह रासेयोचे स्वयंसेवक आणि महाविद्यालयीन कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले. ‘पर्यावरण वाचवा’ या संकल्पाने कार्यक्रमाची सांगता झाली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!