अमळनेर : वन महोत्सव कालावधीचे औचित्य साधून “एक पेड माँ के नाम” या देशव्यापी उपक्रमांतर्गत, पर्यावरण व वृक्ष संवर्धन आणि ‘हरित अमळनेर’ घडविण्याच्या उद्देशाने रोटरी क्लब अमळनेर तर्फे “वृक्षारोपण अभियान २०२६” अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले.

रोटरी क्लब अमळनेर, अमळनेर नगर परिषद, महिला हाऊसिंग ट्रस्ट अमळनेर, पर्यावरण सखी व सामाजिक वनीकरण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने रो. अजयभाऊ केले यांच्या घरासमोरील खुल्या जागेत हा स्तुत्य उपक्रम राबविण्यात आला.
असा झाला कार्यक्रम…
कार्यक्रमाच्या प्रारंभी वनपरिक्षेत्र अधिकारी, वनपाल श्रीमती सुनीता धनगर, वनरक्षक श्रीमती अलका पाटील व वनरक्षक जगदीश ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.
वाढदिवसाचे अनोखे पर्यावरणपूरक सादरीकरण
या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण म्हणजे रो. अजय केले यांच्या धर्मपत्नी सौ. विनिता अजय केले यांचा वाढदिवस! त्यांचा वाढदिवस केक कापून नव्हे, तर पर्यावरणपूरक पद्धतीने वृक्षारोपण करून साजरा करण्यात आला. या अभिनव आणि आदर्श उपक्रमाचे उपस्थितांनी विशेष कौतुक केले.
‘भाग्यश्री’ सेंद्रिय खताची भेट!
यावेळी प्रसिद्ध डॉक्टर शिबी वशिष्ठ यांनी त्यांच्या सुप्रसिद्ध “भाग्यश्री” या शेळ्यांच्या लेंड्यापासून तयार केलेले विशेष सेंद्रिय खत वृक्षांच्या वाढीसाठी भेट दिले. हे खत वृक्ष टवटवीत राहून त्यांची वाढ जलद व्हावी यासाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
नागरिकांना वृक्ष संगोपनाचे आवाहन
याप्रसंगी बोलताना रोटरी क्लबचे अध्यक्ष रो. महेश पाटील आणि सचिव रो. प्रशांत निकम यांनी सांगितले की, “वन महोत्सवाच्या माध्यमातून ‘एक पेड माँ के नाम’ हा संदेश घराघरात पोहोचवणे काळाची गरज आहे.” तर प्रोजेक्ट चेअरमन रो. अजय केले व रो. आशिष चौधरी यांनी प्रत्येक नागरिकाने केवळ झाड न लावता, किमान एका तरी वृक्षाचे दत्तक घेऊन त्याचे संगोपन करावे, असे आवाहन केले.
या उपक्रमात रोटरी क्लबचे सदस्य विवेक देशमुख, अजय रोडगे, कीर्तिकुमार कोठारी, दिनेश रेझा, प्रतीक जैन यांच्यासह शहरातील अनेक पर्यावरणप्रेमींनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला.
“एक झाड लावूया… पर्यावरण वाचवूया” या पर्यावरणपूरक संदेशासह आणि उपस्थितांसाठी चहा-नाश्त्याच्या आस्वादाने कार्यक्रमाची सांगता झाली. ही माहिती रोटरी क्लबचे पीआरओ मकसूद बोहरी यांनी प्रसिद्धीस दिली आहे.
