मुंबई/अमळनेर : उत्तर महाराष्ट्राचे श्रद्धास्थान आणि ‘प्रति पंढरपूर’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अमळनेर येथील श्री संत सखाराम महाराज वाडी संस्थानला लागलेल्या भीषण आगीच्या दुर्दैवी घटनेचे पडसाद थेट विधानसभेत उमटले आहेत. माजी मंत्री तथा आमदार अनिल भाईदास पाटील यांनी मुंबईत सुरू असलेल्या पावसाळी अधिवेशनात ‘पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशन’ अंतर्गत हा प्रश्न मांडून सभागृह आणि महाराष्ट्र शासनाचे तातडीने लक्ष वेधले.

२५० वर्षांचे वैभव जळून खाक, १५ कोटींचे नुकसान
यावेळी विधानसभेत बोलताना आमदार अनिल पाटील म्हणाले की, सुमारे २५० वर्षांची गौरवशाली परंपरा लाभलेल्या या पवित्र वाडी मंदिरात १ जुलैच्या रात्री आगीची अत्यंत दुर्दैवी घटना घडली. या आगीत मंदिराच्या गाभाऱ्यातील सुमारे २५० वर्षांचे ऐतिहासिक व सांस्कृतिक वैभव जळून नष्ट झाले आहे. सुदैवाने मंदिर आणि मूर्ती सुरक्षित राहिल्या असल्या, तरी गाभाऱ्याचे सुमारे १५ कोटी रुपयांपेक्षा जास्त आर्थिक नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. या घटनेमुळे सुरक्षेच्या कारणास्तव मंदिर सध्या दर्शनासाठी बंद ठेवण्यात आले आहे.
आषाढी एकादशीपूर्वी पुनरुज्जीवन आवश्यक
चालू महिन्यामध्ये २५ जुलै रोजी पंढरपूर येथील आषाढी एकादशी महोत्सव आहे. अमळनेरचे हे वाडी मंदिर ‘प्रति पंढरपूर’ म्हणून प्रसिद्ध असल्याने आषाढीला येथे हजारो भाविक विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनासाठी येत असतात. भाविकांची ही अपार श्रद्धा आणि भावना लक्षात घेता, आषाढीपूर्वी या मंदिराचे पुनरुज्जीवन आणि पुनर्बांधणी करणे अत्यंत गरजेचे आहे, याकडे आमदार पाटील यांनी सरकारचे लक्ष वेधले.
शासनाकडे प्रमुख मागण्या:
मंदिराचे स्ट्रक्चरल ऑडिट (Structural Audit) लवकरात लवकर पूर्ण करण्यात यावे.
पर्यटन विकास विभागाच्या माध्यमातून या संस्थानचा तातडीने ‘तीर्थक्षेत्र विकास आराखड्या’त समावेश करावा.
नुकसान भरपाई आणि पुनर्बांधणीसाठी शासनाने तातडीने प्रस्ताव मागवून निधी मंजूर करावा.
