अमळनेर : येथील संपूर्ण महाराष्ट्रात ‘प्रति पंढरपूर’ म्हणून प्रसिद्ध असलेल्या संत सखाराम महाराज वाडी संस्थानात १ जुलै रोजी रात्री ८ वाजेच्या सुमारास शॉर्ट सर्किटमुळे भीषण आग लागली. या दुर्घटनेत मंदिराच्या मुख्य सभामंडपाचे मोठे नुकसान झाले आहे. मात्र, या संकटाच्या क्षणी धर्म, जात आणि राजकीय भेद विसरून हिंदू-मुस्लिम बांधवांनी जीवाची पर्वा न करता एकत्र येत आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. अमळनेरकरांनी दाखवलेल्या या अभूतपूर्व एकोप्यामुळे शहरात सामाजिक ऐक्याचे अत्यंत प्रेरणादायी दर्शन घडल्याची भावुक भावना वाडी संस्थानचे गादीपुरुष प.पू. प्रसाद महाराज यांनी व्यक्त केली आहे.

…आणि देव शाबूत राहिले! ईश्वरी कृपेने गाभारा सुरक्षित
या भीषण आगीत जरी मंदिराच्या सभामंडपाची मोठी हानी झाली असली, तरी गाभाऱ्यातील देवमूर्ती पूर्णपणे सुरक्षित राहिल्या आहेत. “बरेच काही जळाले, पण देव शाबूत राहिले; यापेक्षा मोठी ईश्वरी कृपा कोणती?” अशी भावना या घटनेनंतर अमळनेरमधील हजारो भाविकांनी व्यक्त केली असून, याला चमत्काराचाच एक भाग मानला जात आहे.
प्रशासनासह लगतच्या तालुक्यांचीही धाव
आग लागल्याची वार्ता समजताच स्थानिक प्रशासकीय अधिकारी, पोलीस दल, होमगार्ड, नगरपालिकेचे अधिकारी, लोकप्रतिनिधी, पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते, आणि वाडी संस्थानचे सर्व पदाधिकारी, विश्वस्त व सेवेकऱ्यांसह हजारो नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. अमळनेरसह शेजारील पारोळा, चोपडा, शिरपूर येथील अग्निशमन दलाच्या गाड्या आणि खाजगी पाणी पुरवठा करणाऱ्या वाहनधारकांनी आग आटोक्यात आणण्यासाठी अहोरात्र प्रयत्न केले. मंदिराच्या पुनर्बांधणीसाठी शासनाकडे तातडीने पाठपुरावा करणाऱ्या सर्व राजकीय नेत्यांचेही यावेळी कौतुक होत आहे.
मातोश्रींच्या निधना वेळी ही न चुकलेली वारी ‘आधी पांडुरंग’ म्हणत सुरूच!
मंदिरावर एवढे मोठे संकट कोसळले असतानाही, प.पू. प्रसाद महाराजांनी आषाढी वारी अर्धवट सोडली नाही. “आधी पांडुरंग” ही भूमिका कायम ठेवत त्यांनी आपली दिंडी पुढे सुरू ठेवली आहे. यापूर्वी स्वतःच्या मातोश्रींचे निधन झाले असतानाही त्यांनी वारी सोडली नव्हती. पांडुरंगाच्या भक्तीपुढे वैयक्तिक दुःख, मोह-माया आणि वेदना दुय्यम ठरतात, ही संतपरंपरेची शिकवण त्यांनी आपल्या कृतीतून पुन्हा एकदा समाजासमोर ठेवली आहे.
”तुम्ही सोबत आहात, मला चिंताllll नाही!” — प.पू. प्रसाद महाराज
”वाडी संस्थानला आग लागल्याचे कळताच अमळनेरकरांनी दाखविलेला एकोपा माझ्यासाठी खूप मोठा आधार आहे. हिंदू-मुस्लिम बांधवांनी हातात हात घालून, जीवाची पर्वा न करता मंदिर वाचविण्यासाठी केलेले प्रयत्न कौतुकास्पद आहेत. प्रशासन, अग्निशमन दल, पोलीस, पत्रकार, लोकप्रतिनिधी, वाडी संस्थांचे सर्व पदाधिकारी, विश्वस्त मंडळ, भक्तगण, सेवेकरी आणि मदतीला धावून आलेल्या प्रत्येक नागरिकाला माझा आशीर्वाद आहे. तुम्ही सर्व माझ्यासोबत आहात, त्यामुळे मला कसलीही चिंता नाही. ‘आधी पांडुरंग’ या भावनेने माझी वारी सुरूच राहील. मंदिराची पुनर्बांधणीही आपल्या सर्वांच्या एकोप्याने नक्कीच उभी राहील.”
