अमळनेर प्रतिनिधी : अमळनेर तालुक्याच्या क्रीडा इतिहासात सुवर्णाक्षरांनी नोंदवली जाईल अशी अत्यंत अभिमानास्पद कामगिरी येथील एका ग्रामीण कन्येने केली आहे. अमळनेरच्या ‘कल्पविजय ज्युदो स्पोर्ट्स अकॅडमी’ची गुणी ज्युदोपटू कु. त्रिष्णा वाघ हिची महाराष्ट्र शासनाच्या अत्यंत प्रतिष्ठित अशा बालेवाडी क्रीडा प्रबोधिनी (पुणे) येथे निवासी ज्युदो प्रशिक्षणासाठी निवड झाली आहे. विशेष म्हणजे, ज्युदो खेळात जळगाव जिल्ह्यातून बालेवाडी प्रबोधिनीसाठी निवडली जाणारी ती पहिली महिला खेळाडू ठरली आहे. तिच्या या ऐतिहासिक यशामुळे संपूर्ण खान्देशात कौतुकाचा वर्षाव होत आहे.
कठोर परीक्षेअंती यशाला गवसणी
महाराष्ट्रातील गुणवंत खेळाडूंना ऑलिम्पिक, आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय स्तरासाठी तयार करणारी बालेवाडी क्रीडा प्रबोधिनी ही राज्यातील सर्वोच्च क्रीडा संस्था मानली जाते. येथे प्रवेश मिळवणे हे प्रत्येक खेळाडूचे स्वप्न असते. राज्यभरातील हजारो खेळाडूंच्या शारीरिक क्षमता, तांत्रिक कौशल्य, शिस्त आणि मानसिक तयारीची अत्यंत कठोर चाचणी घेतली जाते. या अत्यंत स्पर्धात्मक प्रक्रियेत त्रिष्णाने आपल्या कौशल्याच्या जोरावर बाजी मारत अमळनेर आणि जळगाव जिल्ह्याचे नाव राज्याच्या क्रीडा नकाशावर ठळकपणे कोरले आहे.
ग्रामीण भागातून थेट क्रीडा प्रबोधिनीपर्यंतचा प्रवास
ग्रामीण भागातील एका सर्वसामान्य कुटुंबात जन्मलेल्या त्रिष्णाने कौटुंबिक अडचणींवर मात करत, केवळ कठोर परिश्रम, जिद्द आणि सातत्यपूर्ण सरावाच्या बळावर हे यश संपादन केले आहे. मैदानावर गाळलेल्या घामाचे आज चीज झाले असून, तिची ही झेप ग्रामीण भागातील शेकडो मुलींना क्रीडा क्षेत्रात मोठी स्वप्ने पाहण्याची नवी प्रेरणा देणारी ठरेल.
यशाचे मार्गदर्शक शिलेदार
त्रिष्णाच्या या यशाचा भक्कम पाया ‘कल्पविजय ज्युदो स्पोर्ट्स अकॅडमी’मध्ये रचला गेला. या प्रवासात तिला तिचे काका तथा NIS ज्युदो प्रशिक्षक सचिन वाघ आणि राष्ट्रीय ज्युदोपटू (ब्लॅक बेल्ट) कु. अश्विनी सोळंके यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. तसेच तिच्या पालकांचे प्रोत्साहन आणि कुटुंबाचा खंबीर पाठिंबा यामुळेच तिने हे शिखर गाठले आहे.
क्रीडा कारकिर्दीला मिळणार नवी दिशा
बालेवाडी क्रीडा प्रबोधिनीमध्ये निवड झाल्यामुळे आता त्रिष्णाला राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय दर्जाचे अत्याधुनिक प्रशिक्षण, अनुभवी प्रशिक्षकांचे मार्गदर्शन, जागतिक दर्जाच्या क्रीडा सुविधा, उत्तम शिक्षण, निवास आणि पौष्टिक आहाराची सुविधा मिळणार आहे. यामुळे तिच्या क्रीडा कारकिर्दीला आता एक नवी उंची आणि गती प्राप्त होणार आहे.
“अमळनेरच्या मातीतील कन्येने जळगाव जिल्ह्याचा इतिहास घडवला आहे; आता लक्ष्य महाराष्ट्रातून भारतासाठी पदक जिंकण्याचे आहे!” अशा शब्दांत क्रीडाप्रेमींनी त्रिष्णा वाघ हिचे मनःपूर्वक अभिनंदन करून तिला पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.
