अमळनेर: उत्तर महाराष्ट्रातील प्रमुख प्रकल्प असलेल्या निम्न तापी प्रकल्पाच्या (पाडळसरे धरण) कामाची पाहणी करण्यासाठी राज्याचे जलसंपदा प्रकल्प व विकास विभागाचे सचिव एकनाथ डवले आले असता, पाडळसरे धरण जनआंदोलन समितीच्या वतीने त्यांना प्रकल्पाच्या कामाला गती देण्याबाबतचे निवेदन देण्यात आले. जलसंपदा विभागातील सचिव पातळीवरील अधिकारी पहिल्यांदाच या प्रकल्पाच्या पाहणीसाठी आले होते.

अडीच दशकांपासून प्रकल्प रखडलेला
१९९९ मध्ये या प्रकल्पाची पायाभरणी झाली असली, तरी राजकीय अनास्था, अपुरा निधी आणि नियोजनाचा अभाव यामुळे हा प्रकल्प तब्बल अडीच दशकांपासून रखडलेला आहे. धरणाचा प्रस्तावित परिसर वर्षानुवर्षे अवर्षणग्रस्त असल्याने धरणात लवकर पाणी अडवणे गरजेचे आहे. त्यासाठी प्रशासनाने या कामाला प्राधान्य देऊन बांधकामासह पुनर्वसनाचे कामही वेगाने पूर्ण करावे, अशी मागणी समितीने केली.
“शेतकऱ्यांचे व विस्थापितांचे प्रश्न स्थानिक पातळीवर सुटण्यासाठी धरणाच्या साईटवरच प्रकल्प कार्यालय सुरू करण्यात यावे.”— पाडळसरे धरण जनआंदोलन समिती

