‘पाऊस किती पडला?’ पेक्षा ‘पीक किती वाचले?’ हे पाहा!…. अमळनेर तालुक्यात खरीप पिकांची दयनीय अवस्था; शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी मदतीची मागणी

   अमळनेर  :  तालुक्यात यंदा मान्सूनचे उशिरा आगमन, त्यानंतर पावसात पडलेले दीर्घ खंड आणि पावसाचे असमान वितरण यामुळे खरीप पिकांची अवस्था गंभीर झाली आहे. पावसाची आकडेवारी समाधानकारक दिसत असली, तरी प्रत्यक्ष शेतशिवारातील परिस्थिती वेगळी असून उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी आर्थिक मदत अथवा अनुदान द्यावे, अशी मागणी अमळनेर तालुका काँग्रेस कमिटीने उपविभागीय अधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली.

तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष बी. के. सूर्यवंशी यांनी निवेदनाद्वारे तालुक्यातील पाऊस, पिकांची सद्यस्थिती, पीकविमा आणि शेती उत्पादनावर होणाऱ्या परिणामांची सविस्तर माहिती प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिली.
यंदा मान्सून उशिरा दाखल झाल्याने खरिपाच्या पेरण्या उशिराने झाल्या. त्यातच आता पावसाने मोठी ओढ दिल्याने जेमतेम तग धरून असलेली खरीप पिके संकटात सापडली आहेत. हवामान विभागाचा आगामी पावसाचा अंदाजही फारसा आशादायक नसल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. सिंचनाची सुविधा असलेल्या मोजक्या शेतकऱ्यांची पिके तग धरून आहेत; मात्र पावसावर अवलंबून असलेल्या कोरडवाहू शेतकऱ्यांची परिस्थिती अत्यंत बिकट असल्याचे काँग्रेसने म्हटले आहे.

मका, मूग, बाजरी, कपाशी, ज्वारी, सोयाबीनला फटका

तालुक्यात साधारणपणे १० ते १२ फूट उंच वाढणारा मका यंदा केवळ ५ ते ६ फूट उंचीपर्यंत वाढला असून कणसांची लांबीही अत्यल्प आहे. या कणसात दाणे व्यवस्थित भरतील की नाही, अशी परिस्थिती आहे. मूग पिकालाही पावसाच्या खंडाचा मोठा फटका बसला आहे. अमळनेरच्या पश्चिम भागात बाजरीचे उत्पादन अत्यल्प होण्याची शक्यता आहे.
उत्तर-पूर्व भागात तापी नदीमुळे सिंचन व्यवस्था तुलनेने चांगली असली, तरी कपाशी पिकावर बोंडअळी व लाल्या रोगाचा प्रादुर्भाव दिसून येत असल्याने कपाशीच्या उत्पादनात ७० ते ८० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. ज्वारी व सोयाबीन पिकांची अवस्थाही चिंताजनक असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
पावसाची आकडेवारी समाधानकारक; मात्र पिकांना फायदा किती?

३१ ऑगस्ट २०२६ पर्यंत अमळनेर, शिरूड, पातोंडा, मारवड, नगाव व अमळगाव मंडळांमध्ये प्रत्यक्ष पर्जन्यमान साधारण ७० ते ८९.३० टक्के असल्याचे सांगण्यात आले. तर भरवस व वावडे मंडळांमध्ये अनुक्रमे १३०.२० व ११७.४० टक्के पाऊस नोंदविला गेला आहे. तालुक्याची सरासरी पर्जन्यमानाची नोंद ४७४.३० मि.मी. असली, तरी पावसाचे वितरण अत्यंत असमान राहिल्याने त्याचा अपेक्षित फायदा पिकांना झालेला नाही.

पावसाची आकडेवारी केवळ कागदावर समाधानकारक दिसते म्हणून शेतीची परिस्थिती चांगली असल्याचे गृहीत धरता येणार नाही. पाऊस किती पडला यापेक्षा तो पिकांना किती उपयोगी ठरला, जमिनीत किती मुरला आणि त्याचा उत्पादनावर काय परिणाम झाला, याचा प्रत्यक्ष आढावा घेणे आवश्यक आहे, अशी भूमिका काँग्रेसने मांडली.
अधिकाऱ्यांनी बांधावर जाऊन पंचनामा करावा
तालुक्यातील लहान बंधारे व तलाव कोरडे पडले असून आगामी काळात काही गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची समस्याही निर्माण होण्याची शक्यता आहे. खरिपाच्या हंगामासाठी खते, बियाणे, कीटकनाशके व शेती मशागतीवर शेतकऱ्यांचा मोठ्या प्रमाणात पैसा खर्च झाला आहे. आता रब्बी हंगामासाठीही खर्च करावा लागणार असल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे.

पावसाची केवळ आकडेवारी न पाहता अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष वावराच्या बांधावर जाऊन पिकांची पाहणी करून वस्तुस्थितीचा अंदाज घ्यावा, अशी मागणी करण्यात आली. प्रत्यक्ष परिस्थितीच्या आधारे शासनाने शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी आर्थिक मदत जाहीर करावी, अशी काँग्रेसची मागणी आहे.

पीकविम्याच्या निकषांवरही प्रश्नचिन्ह

पावसाच्या खंडामुळे शेतकऱ्यांना २५ टक्के पीकविमा अग्रीम भरपाई मिळण्याची शक्यता होती. मात्र, पीकविमा कंपनीने पावसाच्या खंडाचा निकष (ट्रिगर) काढून त्याऐवजी पिकाच्या उत्पादनावर आधारित निकष ठेवला असल्याचे निवेदनात म्हटले आहे. याशिवाय यंदा तुलनेने कमी शेतकऱ्यांनी पीकविमा काढला असून बँका, विमा पोर्टल आणि पीकविम्याच्या निकषांमध्ये झालेल्या बदलांसह विविध कारणांचा त्यावर परिणाम झाल्याचे काँग्रेसने नमूद केले.
शेतकऱ्यांच्या अडचणींचा तत्त्व आणि व्यवहार यांचा समन्वय साधून निर्णय घेण्याची गरज असून, पावसाची आकडेवारी नव्हे तर प्रत्यक्ष पीकस्थिती हा मदतीचा आधार असावा, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली.

निवेदन देताना तालुका काँग्रेस कमिटी अध्यक्ष बी. के. सूर्यवंशी, महिला जिल्हाध्यक्षा सौ. सुलोचना वाघ, मनोज पाटील, प्रा. श्याम पवार, रामकृष्ण पाटील, शरद पाटील, डॉ. प्रकाश सोनवणे, कन्हैयालाल कापडे, रोहिदास कापडे, दिलीप पाटील, पी. वाय. पाटील, बन्सीलाल भागवत, शालिग्राम पाटील, राजेंद्र चौधरीसर, हर्षल जाधव, धोंडू महाजन, भगवान संदानशिव, सुभाष शिंदे, सुधाकर भैसे, पितांबर पाटील, गजेंद्र साळुंखे, राजेंद्र भाट, डॉ. रवींद्र पाटील, भिकाजी पाटील, अशोक पाटील आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!