अमळनेरवर काळाचा घाला! वेगवेगळ्या अपघातांत एकाच दिवसात ७ जणांचा मृत्यू; संपूर्ण तालुका हादरला

    अमळनेर ,अमळनेर शहर आणि तालुक्यासाठी आजचा दिवस अत्यंत घातकी आणि वेदनादायी ठरला आहे. वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या तीन भीषण अपघातांमध्ये एकाच दिवसात तब्बल ७ जणांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. या लागोपाठ झालेल्या दुर्घटनांमुळे संपूर्ण अमळनेर तालुक्यात दुःखाचे तांडव माजले असून, सर्वत्र तीव्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

१. मंगरूळनजीक तिहेरी अपघातात ६ जणांचा मृत्यू; साखरपुड्याचा आनंद शोकात बदलला

सर्वात मोठी आणि भीषण दुर्घटना अमळनेर-धुळे रस्त्यावरील मंगरूळ गावाजवळ घडली. येथे एस.टी. बस, चारचाकी (कार) आणि दुचाकी यांच्यात झालेल्या तिहेरी अपघातात तब्बल ६ जणांचा जागीच मृत्यू झाला.

साखरपुड्यासाठी येत होता परिवार:

अपघातातील मृत व्यक्ती हे सुरत येथील रहिवासी असलेले ‘महाजन परिवार’ होते. आपल्या भाच्याच्या साखरपुड्याच्या आनंदाच्या सोहळ्यासाठी ते कारने अमळनेरकडे येत होते. मात्र, अमळनेर गाठण्यापूर्वीच काळाने त्यांच्यावर झडप घातली. एका क्षणात आनंदाचे वातावरण कारुण्यात बदलले.

मृत्यू मुखी पडलेल्या व्यक्तींची नावे 

1) सुरेश विक्रम माळी वय 52 वर्षे, रा. व्यारा (गुजरात)

2) नंदलाल गोपाल महाजन वय 60 वर्षे, रा. व्यारा (गुजरात)

3) निर्मलाबाई नंदलाल महाजन वय 54 वर्षे, रा. व्यारा (गुजरात)

4) अनिता सुरेश महाजन वय 40 वर्षे रा. व्यारा (गुजरात)

5) निलेश सुकदेव तावडे वय 25 वर्षे, रा. मालपुर ता. शिंदखेडा,

6) फाल्गुनी एकनाथ भोई वय 21 वर्षे, रा. धरणगांव ता. धरणगांव

जखमीचे नाव-

1) आदित्य चंद्रकांत महाजन वय 23 वर्षे रा. व्यारा (गुजरात)

2) दिपक दिलीप पाटील वय 44 वर्षे, रा. मंगरुळ ता. अमळनेर

२. परीक्षा देऊन घरी परतणाऱ्या चेतन महाजन या शिपायाचा नाल्यात पडून मृत्यू.

दुसरी दुर्दैवी घटना अमळनेर-चोपडा रस्त्यावरील नांद्री गावाजवळ घडली. येथील एका नाल्यात चेतन महाजन नामक व्यक्ती दुचाकीसह पडल्याने जागीच मृत्यू झाला.

मृत व्यक्तीची ओळख: मृत कर्मचारी अमळनेर येथील ‘विजय नवल पाटील आर्मी स्कूल’ येथे शिपाई पदावर कार्यरत होते.

अशी घडली घटना: ते अमळनेर येथे यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाची (YCMOU) परीक्षा देण्यासाठी आले होते. परीक्षा संपवून आपल्या धरणगाव तालुक्यातील ‘रोटवद’ या गावी दुचाकीने परत जात असताना, नांद्री गावाजवळील नाल्यात त्यांची दुचाकी कोसळली आणि त्यांचा जागीच प्राण गेला.

३. लखनौत शिक्षण घेणाऱ्या अमळनेरच्या तरुण डॉक्टरांचा अपघाती अंत

तिसरी वेदनादायी घटना उत्तर प्रदेशातील लखनौ येथे घडली, ज्याचे कनेक्शन अमळनेर तालुक्याशी आहे. तालुक्यातील सारबेटा गावाचे मूळ रहिवासी असलेले डॉ. सुमित पाटील हे लखनौ येथे वैद्यकीय क्षेत्रात उच्च शिक्षण घेत होते. रात्री ८ वाजेच्या सुमारास ते आपल्या दुचाकीने जेवण करण्यासाठी जात असताना, रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या एका ट्रकला त्यांच्या दुचाकीने मागून जोरदार धडक दिली. या भीषण धडकेत डॉ. सुमित यांचा मृत्यू झाला. एका तरुण आणि हुशार डॉक्टराच्या जाण्याने पाटील कुटुंबासह सारबेटा गावावर शोककळा पसरली आहे.

अमळनेरकरांना सुन्न करणारा दिवस

एकाच दिवसात ७ जणांचा वेगवेगळ्या अपघातात बळी गेल्याची माहिती वाऱ्यासारखी पसरताच संपूर्ण अमळनेर शहर आणि तालुक्यात शोककळा पसरली आहे. दिवसभर शहरात, चौकाचौकात आणि सोशल मीडियावर केवळ याच दुर्दैवी घटनांची आणि मृतांची चर्चा सुरू होती. या घटना अमळनेरकरांच्या काळजाला घर पाडणाऱ्या ठरल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!