अमळनेर-धुळे हायवेवर काळजाचा थरकाप उडवणारा अपघात; तिहेरी धडकेत ६ जणांचा जागीच मृत्यू, साखरपुड्याचा आनंद शोकात बदलला!

अमळनेर: अमळनेर-धुळे महामार्गावर मंगरूळ गावाजवळ सोमवारी सकाळी एक अत्यंत भीषण तिहेरी अपघात घडला. कार, मोटरसायकल आणि एसटी बस यांच्यात झालेल्या या थरारक धडकेत सहा जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात प्रचंड शोककळा पसरली असून वाहनांचा अक्षरशः चक्काचूर झाला आहे.

कसा घडला अपघात?

प्राप्त माहितीनुसार, सोमवारी सकाळी ७ वाजेच्या सुमारास मंगरूळ गावाच्या पुढे असलेल्या हॉटेल वृंदावनजवळ हा अपघात झाला. अमळनेरकडून धुळ्याच्या दिशेने मोटरसायकल (क्र. MH-18 C-8719) आणि एसटी बस (क्र. MH-13 CU-7540) जात होत्या. याच वेळी धुळ्याकडून येणाऱ्या एका भरधाव कारने (क्र. GJ-19 AF-3147) चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे समोरून येणाऱ्या एसटी बस आणि मोटरसायकलला जोरदार धडक दिली.

साखरपुड्यासाठी येत असलेल्या कुटुंबावर काळाचा घाला

या भीषण अपघातात मोटरसायकलचा पूर्णपणे चेंदापेंदा झाला असून, धरणगाव येथील रहिवासी असलेल्या मोटरसायकलस्वाराचा जागीच मृत्यू झाला.

दुसरीकडे, कारमधील पाच प्रवाशांचाही घटनास्थळीच दुर्दैवी मृत्यू झाला. हे सर्व मृत गुजरात राज्यातील व्यारा येथील एकाच कुटुंबातील होते. मृतांची नावे खालीलप्रमाणे आहेत:

आदित्य चंद्रकांत महाजन

अनिता सुरेश महाजन

निर्मला नंदलाल महाजन

नंदलाल गोपाल महाजन

सुरेश विक्रम महाजन

हे सर्वजण अमळनेर येथे एका साखरपुड्याच्या आनंदाच्या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी येत होते. मात्र, त्याआधीच त्यांच्यावर काळाने घाला घातला.

लहान मुलाला मिळाले जीवदान!

अपघातानंतर कारचा चक्काचूर झाला होता आणि त्यात एक लहान मुलगा अडकून पडला होता. परंतु, स्थानिक ग्रामस्थ, पोलीस आणि एसटी कर्मचाऱ्यांनी दाखवलेल्या तत्परतेमुळे या लहान मुलाला कारमधून सुखरूप बाहेर काढण्यात यश आले. तसेच एसटी बसमधील दीपक दिलीप पाटील हे प्रवासी जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

पोलीस आणि ११२ आपत्कालीन सेवेची तत्परता

अपघाताची माहिती मिळताच ‘११२’ आपत्कालीन सेवेच्या माध्यमातून पोलीस यंत्रणा तात्काळ घटनास्थळी दाखल झाली. पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम, हेडकॉन्स्टेबल कैलास शिंदे, रवी पाटील आणि पोलीस पाटील भागवत पाटील यांनी तातडीने मदतकार्य सुरू केले. जखमींना ‘१०८’ रुग्णवाहिकेद्वारे रुग्णालयात हलवण्यात आले.

या भीषण अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. नागरिकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली होती. पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात पाठवले असून, पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!