कर्जबाजारी अमळनेर नगर परिषदेचा १६१ वा वर्धापन दिन संपन्न; डबघाईला आलेली न.पा. बाहेर काढण्यासाठी सामूहिक प्रयत्नांचे आवाहन

अमळनेर : गेल्या १५ वर्षांपासून साजरा न झालेला अमळनेर नगर परिषदेचा १६१ वा वर्धापन दिन अखेर संपन्न झाला. मात्र, या कार्यक्रमाला नगरसेवकांची उपस्थिती अत्यंत तोडकी (अल्प) होती. तोडके नगरसेवक आणि कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या या कार्यक्रमात, सध्या कर्जबाजारी आणि डबघाईला आलेल्या नगर परिषदेला या बिकट परिस्थितीतून बाहेर काढण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन प्रामाणिक प्रयत्न करावेत, असे आवाहन उपस्थित मान्यवरांनी आपल्या मनोगतात केले.

शहराच्या विकासासाठी विरोधकांनी राजकारण बाजूला ठेवावे: गट नेते पंकज चौधरी

कार्यक्रमात बोलताना गट नेते पंकज चौधरी यांनी अमळनेर शहराच्या विकासावर भर दिला. ते म्हणाले की, “अमळनेर शहराचा विकास साधायचा असेल, तर विरोधकांनी कोणत्याही प्रकारचे राजकारण न करता प्रशासनाला आणि सत्ताधाऱ्यांना सकारात्मक सहकार्य केले पाहिजे.” तसेच, नगर परिषदेच्या कामगारांनीही या प्रक्रियेत हिरीरीने आणि उत्साहाने भाग घेऊन आपले योगदान द्यावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

सामूहिक सहभागाशिवाय विकास अशक्य: मुख्याधिकारी गणेश शिंदे

नगर परिषदेचे मुख्याधिकारी गणेश शिंदे यांनी उपस्थितांना संबोधित करताना पालिकेच्या सद्यस्थितीवर प्रकाश टाकला. ते म्हणाले की, “कोणत्याही शहराचा विकास हा केवळ प्रशासनाच्या बळावर होत नसून, तो सामूहिक सहभागाशिवाय शक्य नाही. नगर परिषदेला आर्थिक आणि प्रशासकीय अडचणींमधून बाहेर काढण्यासाठी कर्मचाऱ्यांसोबतच अमळनेरच्या नागरिकांनी देखील नगर परिषद प्रशासनाला योग्य ते सहकार्य करणे गरजेचे आहे.”

विस्कळीत आर्थिक घडी आणि राजकीय उदासीनतेमुळे गेल्या दीड दशकापासून साजरा  न झालेला वर्धापन दिन घाई गडबडीत झाल्याने कर्मचाऱ्यांमध्ये समाधान व्यक्त होत असले, तरी लोकप्रतिनिधींच्या अल्प उपस्थितीमुळे राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरू आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!