अमळनेर : पश्चिम रेल्वेचे जनरल मॅनेजर रामशरय पांडे यांनी आज अमळनेर रेल्वे स्थानकाला भेट देऊन ‘अमृत भारत स्टेशन’ योजनेंतर्गत सुरू असलेल्या विकासकामांची प्रत्यक्ष पाहणी केली. याप्रसंगी जळगाव लोकसभा क्षेत्राच्या खासदार स्मिताताई वाघ, डी.आर.एम. पंकज सिंग, डी.सी.एम. आदिश पठानिया आणि अधिकारी हिमांशू शर्मा उपस्थित होते. पाहणीदरम्यान खासदार वाघ यांनी प्रवाशांच्या सोयीसाठी सुरू असलेल्या कामांमध्ये आवश्यक सुधारणा व नागरी सुविधा वाढवण्याच्या सूचना प्रशासनाला केल्या.

नरडाणा येथे रेल्वे बायपास करण्याची महत्वपूर्ण मागणी
धुळे आणि जळगाव रेल्वेने थेट जोडले जावे यासाठी नरडाणा येथे रेल्वे बायपास तयार करण्यात यावा, अशी महत्त्वाची मागणी खासदार स्मिताताई वाघ यांनी जनरल मॅनेजर यांच्याकडे पत्राद्वारे केली. हा बायपास भविष्यात मुंबई-पुणे मार्गावरील गाड्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा व खानदेशातील प्रवाशांना फायदेशीर ठरणार असल्याचे त्यांनी सांगितले.

