अमळनेरकरांचे जलसंकट मिटणार! १९४ कोटींची २४x७ पाणीपुरवठा योजना प्रगतीपथावर…. आमदार अनिल पाटील आणि नगराध्यक्ष डॉ. बाविस्कर यांच्याकडून कामाची संयुक्त पाहणी

अमळनेर: शहराचा पाणीप्रश्न कायमस्वरूपी सोडवण्यासाठी आमदार अनिल पाटील यांच्या प्रयत्नाने मंजूर झालेल्या १९४.५४ कोटी रुपयांच्या पाडळसरे धरण २४x७ पाणीपुरवठा योजनेचे काम वेगाने सुरू आहे. रविवार, २४ मे रोजी आमदार अनिल पाटील आणि शिवसेना (शिंदे गट) चे नगराध्यक्ष डॉ. परीक्षित बाविस्कर यांनी नगरसेवकांसह पाडळसरे येथील कामधडक्याची प्रत्यक्ष पाहणी केली. शहराच्या विकासासाठी आमदार आणि नगराध्यक्ष एकत्र आल्याचे चित्र यावेळी पाहायला मिळाले.

कामाची सद्यस्थिती आणि प्रगती:

एकूण काम: योजनेचे एकूण ३५ टक्क्यांहून अधिक काम पूर्ण झाले आहे. तापी नदीकाठी इंटेकवेल, इन्फेक्शन वेल आणि जॅकवेलचे काम २० टक्क्यांपेक्षा जास्त झाले आहे.

पाईपलाईन: शहरात आवश्यक २११.५ किमी पैकी ९२ किमीहून अधिक पाईपलाईन टाकून पूर्ण झाली आहे.

जलशुद्धीकरण केंद्र: नवनाथ टेकडीवर उभारण्यात येत असलेल्या २८ एमएलटी क्षमतेच्या जलशुद्धीकरण केंद्राचे काम ४० टक्के पूर्ण झाले आहे.

जलकुंभ: १८.६० लक्ष व १९.५८ लक्ष लिटर क्षमतेच्या मोठ्या जलकुंभांचे काम प्रगतीपथावर आहे.

योजनेचे मुख्य वैशिष्ट्य: पाडळसरे धरणातील वर्षभर राहणाऱ्या जलसाठ्यामुळे अमळनेरकरांना दररोज पाणी मिळणार आहे. तसेच, या योजनेत सोलर प्रोजेक्टची तरतूद असल्याने भविष्यात वीज बिलात मोठी बचत होणार आहे.

चालू उन्हाळ्यातील पाणीटंचाई लक्षात घेता, हे काम युद्धपातळीवर पूर्ण करण्याचे निर्देश आमदार अनिल पाटील यांनी संबंधित अधिकाऱ्यांना आणि ठेकेदारांना दिले आहेत. या पाहणी दौऱ्याप्रसंगी नगरसेवक, पालिकेचे मुख्याधिकारी गणेश शिंदे, अभियंता आणि राष्ट्रवादी व शिवसेना पक्षाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!