अमळनेर येथील झाडी ग्रामपंचायतच्या भ्रष्ट व गैरकारभाराला कारणीभूत सरपंच,ग्रामसेवकांच्या व सत्ताधारी सदस्यांच्या मनमानी विरुद्ध काही सदस्य व ग्रामस्थानीं ग्रामसेवकाची प्रतिमा बोडीओ यांना भेट देऊन केला निषेध.

सविस्तर वृत्त असे की,झाडी येथील प्रभारी ग्रामसेवक हें नियमित मासिक सभा न होणे, ग्रामसभा न घेणे,आर्थिक व्यवहारात अफराटफर करणे, बनावट दस्तऐवज निर्माण करणे,शासनाची फसवणूक करणे, संशयित अपहार, ग्रामसेवकांची अनुपस्थिती, गावाला पिण्यासाठी पाणी उपलब्ध नसणे,स्वच्छतागृहे मुताऱ्यांची अस्वच्छता, गटारी दोन वर्षापासून तुंबलेल्या अवस्थेत अशा अनेक समस्यांना कंटाळून उपोषणे, निवेदने, तक्रारी ग्रामपंचायत सदस्यांसह ग्रामस्थांनी वरिष्ठ प्रशासन म्हणून पंचायत समिती व जिल्हा परिषदेला वारंवार केल्या परंतु गेंड्याच्या कातडीच्या जिल्हा परिषदेच्या व पंचायत समितीच्या प्रशासनाला एक साधी चौकशी करून दोषींवर कार्यवाही करण्याची तसदी देखील घ्यावीशी वाटली नाही. श्री सुकलाल मालचे झाडी येथे ग्रामसेवक आहेत. त्यांच्याकडे अतिरिक्त कारभार आहे.त्यांच्याकडून तो अतिरिक्त प्रभार काढून त्यांच्या जागी नवीन ग्रामसेवक देण्यात यावा अशी वारंवार मागणी ग्रामस्था कडून करण्यात आली.
विशेष म्हणजे सुशांत पाटील, किशोर शिंदे,आय.ए.एस.अधिकारी अर्पित चव्हाण आणि आताचे एन आर पाटील तसेच दरम्यान अजून दोन अधिकारी येऊन गेले पण यांनी ही कुठल्याच प्रकारची दखल घेतली नसल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.

ग्रामस्थ प्रा डॉ विलास पाटील यांनी पत्रकारांना सांगितले की,ग्रामपंचायतीला संरक्षण पंचायत समितीचे, पंचायत समितीला संरक्षण जिल्हा परिषदेचे, जिल्हा परिषदेचे अधिकाऱ्यांना संरक्षण सीईओंचे असा भोंगळ कारभार आज सर्व दूर आपणास पहावयास मिळतो. दाद मागून कंटाळून त्याचा निषेध म्हणून आज ग्रामपंचायत सदस्यांसह ग्रामस्थांनी माननीय बीडिओ एन आर पाटील यांचा शाल, पुष्पगुच्छ व प्रशासनाचे लाडके विद्यमान ग्रामसेवकांची प्रतिमा भेट देत गांधीगिरी सत्कार करून निषेध नोंदविला. आता तरी प्रशासनाला जाग येईल आणि आमच्या गावाला चांगला नियमितपणे येणारा पारदर्शी ग्रामसेवक मिळेल व आजपर्यंतच्या सर्व तक्रारीवर कार्यवाही होईल ही अपेक्षा आहे.
याप्रसंगी ग्रामपंचायत सदस्य निंबा लोटण पाटील,माजी सदस्य दिनेश सुभाष पाटील,दरबारसिंग पाटील, व्यंकट पाटील, जगदीश पाटील इ. उपस्थित होते.
