मुंबई : राज्यातील सर्वसामान्यांची जीवनवाहिनी मानल्या जाणाऱ्या एसटीने ऐन सणावारांच्या दिवसांत तब्बल १० टक्के भाडेवाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. ही भाडेवाढ १५ऑक्टोबर ते ५ नोव्हेंबर याकालावधीत लागू असणार आहे. या निर्णयामुळे दिवाळीच्या निमित्ताने गावी जाणाऱ्या चाकरमान्यांसह सर्वसामान्य नागरिकांच्या खिशाला मोठी झळ बसणार आहे.
यासंबंधीच्या मिळालेल्या माहितीनुसार,राज्य परिवहन महामंडळाने दिवाळीच्या काळात १० टक्के भाडेवाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. ही भाडेवाड सरसकट सर्वच बसेसना लागू असणार नाही. या निर्णयातून वातानुकूलित शिवनेरी वशिवाई बसेस वगळण्यात आल्या आहेत. त्यामुळे गावखेड्यापासून रातराणीने लांब पल्ल्याचा प्रवास करणाऱ्या सर्वच प्रवाशांना या भाडेवाढीचा फटका बसणार आहे.
राज्यात सध्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांसह सर्वसामान्य नागरिक मेटाकुटीस आला आहे. त्यातच एसटीने ही भाडेवाढ केल्यामुळे त्याची झळ या सर्वसामान्य नागरिकांना बसणार आहे. ताज्या भाडेवाढीमुळे ज्या ठिकाणी पूर्वी १०० रुपये तिकिट होते, तिथे आता ११० रुपये आकारले जाण्याची शक्यता आहे.
उल्लेखनीय बाब म्हणजे गतवर्षी टॅक्सी व रिक्षा चालक संघटनांकडून भाडेवाढीचा प्रस्ताव देण्यात आला होता. त्यानंतर महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन मंडळाकडून देण्यात आलेल्या भाडेवाढीच्या प्रस्तावाला मान्यता देण्यात आली होती. त्यामुळे नव्या वर्षात एसटीचा प्रवास महागला होता. २४ जानेवारी २०१५ पासून एसटीची भाडेवाढ लागू करण्यात आली होती.
सणावारांच्या दिवसांत प्रवाशांच्या खिशावर ताण
उल्लेखनीय बाब म्हणजे दिवाळीच्या काळात एसटी महामंडळाची अग्निपरीक्षा असते, कारण या काळात राज्यभरातील चाकरमानी आपापल्या गावी जातात. सुट्ट्या असल्यामुळे बसस्थानकावर प्रवाशांची प्रचंड गर्दी असते. एसटीला चांगला महसूल मिळतो. त्यामुळे सणावाराच्या दिवसांत प्रवाशांचा वाढणारा ओघ व त्यातून मिळणारा महसूल लक्षात घेता एसटीने दिवाळीच्या काळात १० टक्के भाडेवाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.
