अमळनेर : जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून पीक कर्ज वाटपाच्या पद्धतीत करण्यात आलेल्या बदलामुळे निर्माण झालेली समस्या अखेर मार्गी लागली आहे. वारसदार शेतकऱ्यांच्या आक्रमक पवित्र्या नंतर संचालक मंडळाने नमती भूमिका घेत जुनीच पद्धत कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे सामाईक खातेदार असलेल्या हजारो शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

नेमका विषय काय होता?
चालू २०२६ च्या आर्थिक वर्षात जिल्हा बँकेने पीक कर्ज वाटपात अचानक बदल केला होता. सामाईक खात्यावरील प्रत्येक वारसदारास स्वतंत्र कर्ज वाटप करण्याच्या सूचना बँकेने दिल्या होत्या. यापूर्वीची पद्धत अशी होती की, सामाईक खात्यातील सर्व वारसदार एका व्यक्तीस ‘संमतीपत्र’ देऊन अधिकृत करायचे आणि त्यानुसार कर्ज व्यवहार सुरळीत पार पडत असे. मात्र, नव्या जाचक अटीमुळे कर्ज मिळण्यात मोठे तांत्रिक अडथळे निर्माण झाले होते, ज्यातून शेतकऱ्यांमध्ये संभ्रमाचे आणि संतापाचे वातावरण होते.
बँकेत खडाजंगी अन् सकारात्मक तोडगा
या गंभीर विषयावर शेतकरी नेते प्रा. सुभाष पाटील यांनी पुढाकार घेत १८ एप्रिल रोजी बँकेच्या चेअरमन यांना निवेदन सादर केले. यावेळी झालेल्या बैठकीत शेतकरी प्रतिनिधी आणि संचालक मंडळ यांच्यात विषयाच्या गांभीर्यावरून काही काळ खडाजंगी झाली. मात्र, नवीन पद्धतीमुळे शेतकऱ्यांची होणारी अडवणूक प्रा. पाटील यांनी प्रभावीपणे मांडली. अखेरीस, परिस्थितीचे गांभीर्य ओळखून संचालक मंडळाने यापूर्वीप्रमाणेच ‘संमतीपत्र’ धारक वारसदारांना कर्ज वाटप करण्याची पद्धत कायम ठेवण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला.
महत्त्वाच्या नेत्यांची उपस्थिती
या महत्त्वपूर्ण बैठकीस बँकेचे चेअरमन संजय पवार, माजी आमदार चिमणराव पाटील, आमदार किशोर पाटील, माजी आमदार सतीश पाटील, प्रताप हरी पाटील यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते. प्रा. सुभाष पाटील, दिनेश पवार, रोहिदास सुखा पाटील यांच्या स्वाक्षरीचे निवेदन यावेळी प्रशासनाला देण्यात आले.
“वारसदार शेतकऱ्यांना कर्ज प्रक्रियेत तांत्रिक अडचण येऊ नये, यासाठी आम्ही बँकेसमोर ठाम भूमिका मांडली. शेतकऱ्यांच्या हिताचा विचार करून संचालक मंडळाने जुनी पद्धत कायम ठेवण्याचा सकारात्मक निर्णय घेतल्याने आता कर्ज वितरण पूर्ववत सुरू होईल.”
— प्रा. सुभाष पाटील (शेतकरी नेते)
