अमळनेर येथे आंतरराष्ट्रीय महिला दिनाचे औचित्य साधून अमळनेर येथील पारस गोल्ड सराफी पेढी, साने गुरुजी फाउंडेशन व उज्वल फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमानाने समाजातील वंचित, निराधार आणि एकल महिलांच्या कर्तृत्वाचा गौरव करण्यात आला. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत मुलांवर सुसंस्कार करून त्यांना घडवणाऱ्या आणि स्वाभिमानाने जीवन जगणाऱ्या १७ महिलांना ‘श्यामची आई सन्मान’ देऊन सन्मानित करण्यात आले.

पिंपळे रोडवरील ओम नगर परिसरात रविवारी (८ मार्च २०२६) हा हृद्य सोहळा पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ब्रह्माकुमारी विद्यादीदी होत्या. प्रमुख अतिथी म्हणून नगरसेविका योगिता कापडणेकर, अपूर्वा चौधरी, सीमा रगडे (पं. स. अमळनेर) यांच्यासह मान्यवर महिला उपस्थित होत्या.
कर्तृत्वाचा सन्मान: भाजीपाला विक्रेत्या ते पीएसआयच्या मातेपर्यंत
या सोहळ्यात मोलमजुरी, धुणीभांडी, भाजीपाला विक्री, पापड उद्योग, पिठाची गिरणी आणि कटलरी व्यवसाय करून कुटुंबाचा गाडा ओढणाऱ्या महिलांचा सत्कार करण्यात आला. यामध्ये आपल्या मुलीला पीएसआय बनवणाऱ्या इंदुबाई पारधी आणि मुला-मुलीला एमपीएससीत यश मिळवून देणाऱ्या कल्पनाबाई कंखरे यांच्यासह सीमा पाटील, प्रतिभा भावसार, कामिनी पवार, ज्योती पाटील, प्रतिभा सोलंकी, भाविका कोरांनी, संगीता पाटील, ईश्वरी पंजवाणी, कविता पाटील, अनिता परदेशी, संध्या मोरे, रोहिणी कढरे, आशा निकम, लताबाई ओतारी आणि स्वाती चौधरी यांना शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह आणि ‘श्यामची आई’ पुस्तक देऊन गौरविण्यात आले.
प्रमुख मान्यवरांचे विचार
नरेंद्र पाटील (अध्यक्ष, साने गुरुजी फाउंडेशन): “उपेक्षित आणि कष्टकरी महिलांच्या पाठीवर कौतुकाची थाप देण्यासाठी आम्ही या उपक्रमाचे आयोजन केले. समाजाचे देणे लागते या भावनेतून हे कार्य सुरू आहे.”
श्री गोकुळ पाटील (माजी केंद्रप्रमुख): “गरजवंतांसाठीचा हा आगळावेगळा कार्यक्रम आहे. भुकेलेल्याला अन्न देणे ही आपली संस्कृती आहे आणि या तीन संस्थांनी खऱ्या अर्थाने संस्कृतीचे जतन केले आहे.”
विद्यादीदी (ब्रह्माकुमारी केंद्र): “जीवनात अध्यात्म आणि कर्माची सांगड घाला. चांगले विचार आणि संस्कारच माणसाला सोबत करतात.”
