लोकमान्य विद्यालयाचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साह संपन्न…. माजी विद्यार्थी तथा न.पा. शिक्षण सभापती शेख नविद यांच्या हस्ते बक्षीस वितरण

      अमळनेर शहरातील लोकमान्य विद्यालयाचा माजी विद्यार्थी असलेले शेख नविद अहमद मुशिरोदीन यांची अमळनेर नगरपरिषदेमध्ये शिक्षण, क्रीडा तथा सांस्कृतिक सभापती पदी निवड झाल्याबद्दल सर्वत्र अभिनंदन होत आहे. याच पार्श्वभूमीवर लोकमान्य विद्यालयाच्या वार्षिक स्नेहसंमेलनाचे औचित्य साधून नवनिर्वाचित सभापती शेख नविद यांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांना बक्षीस वितरण करण्यात आले.

         या कार्यक्रमात शेख नविद यांनी आपल्या विद्यार्थी जीवनातील आठवणींना उजाळा देत, लोकमान्य विद्यालयाने घडविलेल्या संस्कारांचा उल्लेख केला. “या शाळेने मला केवळ शिक्षणच नाही तर सामाजिक जाणीव, शिस्त आणि नेतृत्वाची दिशा दिली. आज या शाळेचा विद्यार्थी म्हणून नगरपरिषदेच्या शिक्षण सभापती पदी काम करण्याची संधी मिळणे हा माझ्यासाठी अभिमानाचा क्षण आहे,” असे भावनिक उद्गार त्यांनी काढले.

         स्नेहसंमेलनात विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमांनी उपस्थितांची मने जिंकली. नृत्य, गीत, नाट्यछटा यांचे सादरीकरण विशेष आकर्षण ठरले. शालेय शिक्षणात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांना शेख नविद यांच्या हस्ते प्रमाणपत्रे व बक्षिसे देऊन गौरविण्यात आले.

           कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थितांनी शेख नविद यांच्या पुढील सामाजिक व शैक्षणिक कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. स्नेहसंमेलनामुळे शाळेतील विद्यार्थ्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले असल्याची भावना सर्वांनी व्यक्त केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!