उत्तर भारताकडून येणाऱ्या वाऱ्यांमुळे पारा १२ अंशावर….आरोग्य प्रशासनाचे आरोग्याची काळजी घेण्याचे आवाहन

अंमळनेर : जिल्ह्यात तापमानाचा पारा १२ अंशांपर्यंत घसरल्यामुळे थंडीची हुडहुडी पुन्हा वाढली आहे.शुक्रवारी दिवसभर किरकोळ अपवाद वगळता थंडी जाणवत होती. उत्तर भारताकडून येणाऱ्या वाऱ्यांमुळे थंडी वाढली असून धुक्याचे प्रमाण देखील वाढल्याचे दिसून येत आहे.

   शहरात गेल्या आठ दिवसांपासून तापमानात मोठे चढ-उतार पहायला मिळत आहेत. काही दिवसांपूर्वी किमान तापमानाचा पारा दहा अंशांच्या खाली घसरला होता. मात्र त्यात पुन्हा वाढ होऊन किमान तापमान १२ अंशांच्या पुढे गेले आहे. त्यामुळे सकाळच्या वेळेस हुडहुडी भरणारी थंडी आणि दुपारच्या वेळी जाणवणारा उन्हाचा कडाका अशी द्विधा स्थिती निर्माण झाली आहे. आकाश निरभ्र राहिल्याने दिवस आणि रात्रीच्या तापमानात मोठी तफावत कायम आहे.गुरुवारी कमाल तापमान २७.८ अंशतर किमान १२.५ अंश नोंदवले गेले.

      शहरातील वातावरणात सकाळी व पहाटे थंडीबरोबरच धुक्याची हलकी दाटी दिसत असून हवेत गारवा जाणवत आहे. दुसरीकडे दुपारच्या वेळेस उन्हाचा चटका वाढल्याने उष्णतेची तीव्रता जाणवत आहे. सध्या दिवसभरातील कमाल तापमान ३० ते ३२ अंशांदरम्यान तर रात्रीचे किमान तापमान १० ते १२ अंशांच्या वर राहत आहे.

    तापमानातील या मोठ्या बदलांचा नागरिकांच्या आरोग्यावरही परिणाम होऊ लागला असून सर्दी, खोकला, ताप या तक्रारी वाढल्याचे दिसून येत आहे.

    हवामान विभागाने राज्यासह जळगांव जिल्ह्यात पुढील तीन ते चार दिवस किमान तापमानात वाढ कायम राहील, असा अंदाज व्यक्त केला आहे. मात्र त्यानंतर पुन्हा एकदा गारठा वाढण्याची शक्यता असल्याचेही विभागाने स्पष्ट केले आहे. राज्यातील बहुतांश भागात थंडी कायम राहणार असून तापमानात आणखी चढ-उतार होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. 

   नागरिकांनी अचानक बदलणाऱ्या हवामानाचा विचार करून स्वतःची काळजी घेण्याचे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!