अमळनेर : तालुक्यातील पातोंडा येथील तरुणाने मंगळवारी संध्याकाळी गळफास लावून आत्महत्येचा प्रयत्न केला होता. आपला मुलगा गळफास लावत असल्याचे त्याच्या नातलगांना समजले. तेव्हा त्यांनी त्यास खाली उतरले. व पातोंडा प्राथमिक आरोग्य केंद्रात त्यास नेले. मात्र तेथे वैद्यकीय अधिकारी नसल्याने व उपचार मिळाला नसल्याने त्या तरुणांचा मृत्यू झाला.

सविस्तर वृत्त असे की, अमळनेर तालुक्यातील पातोंडा येथील प्रवीण एकनाथ बिरारी (वय 26) या तरुणाने मंगळवारी संध्याकाळी सहा वाजेच्या सुमारास गळफास लावून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. ही बाबत त्याचे वडील व भाऊ तसेच इतर नातलगांना समजताच त्यांनी त्यास खाली उतरवून उपचार घेण्यासाठी तात्काळ जवळच असलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्रात नेले. मात्र त्या ठिकाणी शिपाई सोडून इतर कुणीही नसल्याने त्यास उपचार मिळाले नाहीत. वैद्यकीय अधिकारी यांना संपर्क करून देखील ते आले नाहीत. सुमारे 1 तास त्या ठिकाणी तरुणाचे नातलग वैद्यकीय अधिकारी यांची वाट पाहत होते. मात्र तरी ना वैद्यकीय अधिकारी, ना नर्स आल्या म्हणून त्यांनी आरोग्य केंद्रातील रुग्णवाहिका बोलावून तरुणास अमळनेर ग्रामीण रुग्णालयात नेण्याचा प्रयत्न केला मात्र त्याचा गावापासून 5 किलोमीटर अंतरावरच जीव गेला. ही सर्व हकीकत तरुणाचे वडील व भाऊ यांनी वृत्त प्रतिनिधीना सांगितली.

पातोंडा प्राथमिक आरोग्य केंद्रात दोन वैद्यकीय अधिकारी ,नर्स व इतर स्टाफ असतांना बऱ्याचदा संध्याकाळी ६ वाजे नंतर आरोग्य केंद्रात कुणीच राहत नसल्याची तक्रार ग्रामस्थानी पत्रकारांशी बोलताना सांगितले. पगार नेमका कशासाठी दिला जातो हा प्रश्न ग्रामस्थ उपस्थित करीत आहे. आरोग्य केंद्रात 24 तास कर्मचारी असायला हवेत, रुग्णांना तात्काळ प्राथमिक उपचार मिळायला हवेत म्हणून प्राथमिक आरोग्य केंद्र शासनाने उभारले आहेत. मात्र तरी रुग्णांचे हाल होत असतील तर यास जबाबदार कोण असा सवाल उपस्थित होतो.
सदर घटनेची दखल जिल्हा वैद्यकीय अधिकारी डॉ सचिन बाहेकर यांनी घेतली असल्याचे सांगितले असून अमळनेर तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ गिरीष गोसावी यांना चौकशीचे आदेश दिल्याचे सांगितले आहे. दरम्यान डॉ गोसावी यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की,वरिष्ठांच्या आदेशानुसार चौकशी करण्यास जात असून सत्यता पडताळून अहवाल वरिष्ठांना कळविण्यात येईल.
