अमळनेर: आपल्या विरोधात साक्ष दिल्याच्या रागातून चार जणांनी एका तरुणाला जाणीवपूर्वक वाळूच्या डंपरखाली ढकलून निर्घृणपणे ठार केल्याची धक्कादायक घटना नांद्री बसस्थानकाजवळ घडली. शरद रतन पाटील असे मयत तरुणाचे नाव आहे.
२८ ऑक्टोबर रोजी नगाव बुद्रुक येथे झालेल्या वादात ज्ञानेश्वर गोसावी यांच्या बाजूने शरद पाटील पंचनाम्यात साक्षीदार झाले होते. याचा राग धरून आरोपींनी त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली होती. ३१ ऑक्टोबरच्या रात्री पावणे दहाच्या सुमारास नांद्री बसस्थानकाजवळ आरोपी विपुल गोसावी, मयुर बोरसे आणि सागर गोसावी यांनी भरधाव आलेल्या वाळूच्या डंपरसमोर शरद पाटील यांना ढकलले. डंपर चालक भरत पाटील याने शरद यांच्या अंगावरून गाडी नेल्याने ते गंभीर जखमी झाले आणि धुळे येथे उपचारासाठी नेताना त्यांचा रस्त्यातच मृत्यू झाला.
घटनेनंतर आमदार अनिल पाटील, उपविभागीय अधिकारी मयुर भंगाळे आणि डीवायएसपी विनायक कोते यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी तातडीने नाकाबंदी करून डंपरसह चालक भरत पाटील याला बुधगाव येथून अटक केली. अमळनेर पोलीस ठाण्यात चौघांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून फरार तिघांचा शोध सुरू आहे.