अमळनेर शिवसेनेत अंतर्गत नाराजीचा स्फोट! युवासेना तालुकाप्रमुख राहुल केंजर आणि शहरप्रमुख भरत पवार यांचे राजीनामे……छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वाराच्या मागणीसाठी काढलेल्या मोर्चात सहभाग ठरला वादाचा मुद्दा; माजी आमदारांच्या नाराजीमुळे पद सोडल्याचे दोघांचे पत्रातून स्पष्टीकरण

 अमळनेर (प्रतिनिधी) : अमळनेर शहर शिवसेनेतील अंतर्गत नाराजी आता उघडपणे समोर आली असून, युवासेना तालुकाप्रमुख राहुल भास्कर केंजर आणि शिवसेना शहरप्रमुख भरत प्रकाश पवार यांनी आपापल्या पदांचे स्वेच्छेने राजीनामे सादर केले आहेत. छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वाराच्या नामकरणाच्या मागणीसाठी काढण्यात आलेल्या मोर्चात सहभागी झाल्याच्या मुद्द्यावरून हा राजीनामा नाट्य घडल्याचे दोघांनीही आपल्या राजीनामा पत्रात नमूद केले आहे.

अमळनेर शहरातील धुळे रोडवरील मुख्य प्रवेशद्वाराला ‘छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वार’ असे नाव देण्यात यावे, या मागणीसाठी सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने मोर्चा काढण्यात आला होता. या मागणीसाठी अनेक दिवसांपासून पाठपुरावा सुरू होता. या समितीशी संबंधित असल्याने तसेच शिवभक्त म्हणून आपली भूमिका मांडण्यासाठी मोर्चात सहभागी झाल्याचे दोन्ही पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.

राहुल केंजर यांचा १ नोव्हेंबरला राजीनामा

युवासेना शिवसेना अमळनेर तालुकाप्रमुख राहुल भास्कर केंजर यांनी १ नोव्हेंबर २०२६ रोजी वरिष्ठ पदाधिकाऱ्यांना पत्र देत तालुकाप्रमुख पदाचा स्वेच्छेने राजीनामा सादर केला. मोर्चात सहभागी झाल्यामुळे माजी आमदार शिरीषदादा चौधरी नाराज झाल्याचे आणि त्यांच्याकडून राजीनामा मागण्यात आल्याचे त्यांनी पत्रात म्हटले आहे. तालुकाप्रमुख म्हणून काम करताना अपेक्षित अधिकार, निर्णयस्वातंत्र्य आणि कामाचे स्वातंत्र्य मिळत नसल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली आहे. स्वाभिमानाशी तडजोड न करता कोणताही वाद न वाढवता आपण पदाचा राजीनामा देत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

भरत पवार यांचाही शहरप्रमुख पदाचा राजीनामा

दरम्यान, शिवसेना शहरप्रमुख भरत प्रकाश पवार यांनी ३० ऑक्टोबर २०२६ रोजी माजी आमदार शिरीषदादा चौधरी, शिवसेना सचिव संजय मोरे आणि जिल्हाध्यक्ष वासुदेव पाटील यांना पत्र देऊन शहरप्रमुख पदाचा राजीनामा सादर केला. प्रवेशद्वाराच्या नामकरणासाठी अनेक दिवसांपासून निवेदने आणि पाठपुरावा करूनही अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याने शिवभक्तांच्या भावनेतून मोर्चात सहभागी झाल्याचे त्यांनी नमूद केले आहे. आपण कोणत्याही राजकीय स्वार्थासाठी किंवा कोणाच्या विरोधासाठी मोर्चात सहभागी झालो नव्हतो, असेही त्यांनी स्पष्ट केले. मात्र, या सहभागामुळे माजी आमदार शिरीष चौधरी नाराज झाल्याने शहरप्रमुख पदाचा राजीनामा मागण्यात आल्याचे त्यांनी पत्रात म्हटले आहे.

दोन्ही पदाधिकाऱ्यांनी आपल्या राजीनामा पत्रांमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांप्रती असलेला आदर, निष्ठा आणि स्वाभिमान कायम राहणार असल्याचे स्पष्ट केले आहे. संघटनेत पद नसले तरी शिवसैनिक आणि शिवभक्त म्हणून कार्यरत राहण्याची भूमिका त्यांनी मांडली आहे.

एका मोर्चाच्या मुद्द्यावरून दोन महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांचे राजीनामे समोर आल्याने अमळनेर शिवसेनेतील अंतर्गत मतभेदांची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. या राजीनाम्यांमुळे स्थानिक शिवसेनेच्या संघटनात्मक परिस्थितीवर काय परिणाम होतो आणि वरिष्ठ नेतृत्व याबाबत काय भूमिका घेते, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!