अमळनेर नगर परिषदेची प्लास्टिक बंदीविरोधात धडक मोहीम! १७५ किलो प्रतिबंधित प्लास्टिक जप्त; दोन व्यावसायिकांवर १० हजारांचा दंड

    अमळनेर : अमळनेर नगर परिषद आरोग्य विभागाच्या वतीने प्रतिबंधित प्लास्टिकचा वापर व विक्री करणाऱ्यांविरोधात मंगळवार, दि. १३ ऑक्टोबर रोजी विशेष तपासणी मोहीम राबविण्यात आली. या कारवाईत तब्बल १७५ किलो प्रतिबंधित प्लास्टिक जप्त करण्यात आले असून, नियमांचे उल्लंघन करणाऱ्या दोन व्यावसायिकांवर एकूण १० हजार रुपयांचा दंड आकारण्यात आला.

       मुख्याधिकारी गणेश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली नगर परिषदेच्या पथकाने शहरातील गुरुकृपा प्लास्टिक, कोमल हॉटेल, संजय प्लास्टिक, बाबा प्लास्टिक आणि अनिल एजन्सी या आस्थापनांची तपासणी केली. तपासणी दरम्यान प्रतिबंधित प्लास्टिकचा वापर व साठवणुकी संदर्भात पाहणी करून नियमांचे उल्लंघन आढळलेल्या दोन ठिकाणी दंडात्मक कारवाई करण्यात आली.

      प्लास्टिकच्या अनियंत्रित वापरामुळे पर्यावरणाचे नुकसान होते. तसेच प्लास्टिक कचऱ्यामुळे नाले तुंबणे, अस्वच्छता वाढणे आणि सार्वजनिक आरोग्याला धोका निर्माण होण्याची शक्यता असते. या पार्श्वभूमीवर प्लास्टिक बंदीच्या नियमांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी नगर परिषद प्रशासनाने ही मोहीम हाती घेतली आहे.

यापुढेही कारवाई सुरू राहणार

     शहरातील व्यापारी, दुकानदार आणि नागरिकांनी प्रतिबंधित प्लास्टिकचा वापर, साठवणूक व विक्री टाळावी, पर्यावरणपूरक पर्यायांचा अवलंब करावा आणि अमळनेर शहर स्वच्छ, सुंदर व प्लास्टिकमुक्त ठेवण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन नगर परिषद प्रशासनाने केले आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध यापुढेही तपासणी करून नियमानुसार दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले.

अधिकारी-कर्मचाऱ्यांचा सहभाग

      या मोहिमेत आरोग्य निरीक्षक किरण कंडारे, संतोष जाधव, योगेश पवार, वाहनचालक बालकृष्ण जाधव, जया सरदार, सतीश बिराडे, आनंद संदानशिव, युनूस शेख, गणेश गडरी, शहर समन्वयक तसेच आरोग्य विभागातील इतर कर्मचारी सहभागी झाले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!