मालमत्ता कर जुन्याच दराने; वाढीव कर आकारणीची अफवा चुकीची – अमळनेर नगरपरिषदेचे स्पष्टीकरण

     अमळनेर  :  शहरातील मालमत्ता कर आकारणी, पुनर्मूल्यांकन आणि नुकत्याच झालेल्या मालमत्ता सर्वेक्षणाबाबत नागरिकांमध्ये निर्माण झालेल्या संभ्रमाच्या पार्श्वभूमीवर अमळनेर नगरपरिषदेने अधिकृत स्पष्टीकरण दिले आहे. नगरपरिषदेने कोणताही नवीन अथवा अतिरिक्त कर लागू केलेला नसून, मालमत्ता कराची आकारणी जुन्याच दराने सुरू असल्याचे मुख्याधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.

      नगरपरिषदेच्या प्रसिद्धी पत्रका नुसार, सन २०१२-१३ ते २०१७-१८ या कालावधीत नियमानुसार चतुर्थ वार्षिक कर आकारणी करण्यात आली होती. त्यानंतर सन २०१८-१९ मध्ये संपूर्ण शहरासाठी नवीन कर आकारणी लागू करताना कोणताही नवीन दर निश्चित करण्यात आलेला नाही. सन २०१२-१३ मधील प्रचलित जुन्या दरानुसारच कर आकारणी सुरू ठेवण्यात आली आहे, असे पालिकेने स्पष्ट केले.

       दरम्यान, दि. ३ ऑगस्ट २०२२ रोजीच्या प्रशासकीय ठरावानुसार नगरपरिषद हद्दीतील सर्व मालमत्तांचे GIS प्रणालीद्वारे सर्वेक्षण, प्रत्यक्ष मोजमाप, कर मूल्यांकन तसेच चतुर्थ वार्षिक कर सुधारणा करण्याचे काम अमरावती येथील कोअर प्रोजेक्ट्स सर्व्हिस अँड कन्सल्टंट प्रा. लि. या संस्थेला देण्यात आले होते. या संस्थेमार्फत शहरातील एकूण २८ हजार २१२ मालमत्तांचे सर्वेक्षण पूर्ण करण्यात आले.

      या सर्वेक्षणात शहरात ४ हजार १८७ नवीन मालमत्ता आढळून आल्या. यापैकी काही मालमत्तांची यापूर्वी नगरपरिषदे कडे नोंद नव्हती, तर काही मालमत्ता नव्याने बांधण्यात आलेल्या असल्याचे पालिकेने स्पष्ट केले आहे. सध्या याच ४ हजार १८७ नवीन मालमत्तांना विशेष नोटिसा बजावण्यात येत आहेत.

      महत्त्वाचे म्हणजे, या नव्याने आढळलेल्या मालमत्तांवरही कोणताही नवीन अथवा वाढीव दर लागू करण्यात आलेला नसून सन २०१२-१३ च्या जुन्या दरानुसारच कर आकारणी केली जात आहे, असे नगरपरिषद प्रशासनाने स्पष्ट केले.

       ही संपूर्ण प्रक्रिया नियमानुसार सुरू असून नागरिकांवर कोणत्याही प्रकारचा अतिरिक्त करबोजा टाकण्यात आलेला नाही. सर्वेक्षणातून नव्याने आढळलेल्या मालमत्तांना कराच्या कक्षेत आणण्याची कार्यवाही करण्यात येत असल्याचे पालिकेने म्हटले आहे.

     दरम्यान, मालमत्ता कराबाबत पसरवल्या जाणाऱ्या अफवा व गैरसमजांवर नागरिकांनी विश्वास ठेवू नये. कर आकारणीबाबतची वस्तुस्थिती समजून घेऊन नागरिकांनी नगरपरिषद प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन अमळनेर नगरपरिषदेच्या वतीने करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!