अमळनेरच्या छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वारास नाव देण्यासह विविध मागण्यांसाठी निवेदन …. नाट्यमंदिराचे सुशोभीकरण, हायमास्ट दिवे व भगवा ध्वज उभारण्याची मागणी; मागण्या पूर्ण न झाल्यास आंदोलनाचा इशारा

अमळनेर  :  शहरातील नागरिक व शिवप्रेमींच्या वतीने शहरातील विविध प्रलंबित मागण्यांसंदर्भात अमळनेर नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. गेल्या काही महिन्यांपासून मांडण्यात येत असलेल्या या मागण्यांकडे प्रशासनाने तातडीने लक्ष देऊन आवश्यक कार्यवाही करावी, अशी मागणी सार्वजनिक शिवजन्मोत्सव समितीच्या वतीने करण्यात आली आहे.

या निवेदनात अमळनेर-धुळे रोडवरील मुख्य प्रवेशद्वारास ‘छत्रपती शिवाजी महाराज’ यांचे नाव देण्यात यावे, अमळनेर शहराच्या सौंदर्यात भर घालणाऱ्या नाट्यमंदिराचे सुशोभीकरण करण्यात यावे, तसेच नाट्यमंदिर परिसरात उंच हायमास्ट दिवे बसविण्यात यावेत आणि नाट्यमंदिर परिसरात भगवा ध्वज उभारण्यात यावा, अशा प्रमुख मागण्या करण्यात आल्या आहेत.

शिवजन्मोत्सवाच्या निमित्ताने दरवर्षी हजारो नागरिक, महिला, लहान मुले तसेच युवक महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या दर्शनासाठी अमळनेर शहरात येतात. त्यामुळे शहरातील प्रमुख ठिकाणे स्वच्छ, सुंदर व आकर्षक असणे आवश्यक असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

विशेषतः नाट्यमंदिर हे अमळनेर शहराच्या सौंदर्यात भर घालणारे महत्त्वाचे ठिकाण असून, त्याच्या परिसराचे सुशोभीकरण, प्रकाशव्यवस्था व भगवा ध्वज उभारल्यास परिसराच्या सौंदर्यात अधिक भर पडेल, असे समितीने म्हटले आहे.

या मागण्यांसंदर्भात वेळोवेळी निवेदने देऊनही अद्याप अपेक्षित कार्यवाही झालेली नसल्याने शिवप्रेमी नागरिकांमध्ये नाराजी निर्माण झाली आहे. फेब्रुवारी महिन्यापर्यंत मागण्यांवर ठोस कार्यवाही करून कामांना सुरुवात न झाल्यास सार्वजनिक शिवजन्मोत्सव समितीच्या वतीने लोकशाही व संविधानिक मार्गाने आंदोलन, उपोषण तसेच इतर शांततामय मार्गांचा अवलंब करण्यात येईल, असा इशारा निवेदनातून देण्यात आला आहे.

शहराच्या विकासासाठी व नागरिकांच्या भावनांचा आदर राखून प्रशासनाने या मागण्यांवर सकारात्मक व तातडीने कार्यवाही करावी, अशी विनंती सार्वजनिक शिवजन्मोत्सव समिती, अमळनेरच्या वतीने करण्यात आली आहे.

याप्रसंगी राहुल अहिरे,जगदीश महाजन,भावेश साळुंखे,तुषार सोनार,शुभम पाटील,मनोज शिंगाणे,राहुल केळकर,भागवत पाटील,गणेश पाटील,अक्षय शिर्के,सागर विसपुते,योगेंद्र बाविस्कर,आशिष अंधारे,आकाश माळी,प्रविण पाटील,छोटू पाटील,अमर सोनार,राकेश शेटे,विजय पाटील आदी शिवभक्त उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!