साने गुरुजी रेल्वे उड्डाणपुलावर भीषण अपघात; कठड्याला धडकून पुलाखाली पडल्याने विजय भार्गव यांचा मृत्यू…..एकाच ठिकाणी वारंवार अपघात; संरक्षण जाळी, स्पीड ब्रेकर आणि सूचना फलक लावण्याची नागरिकांची मागणी

      अमळनेर : शहरातील साने गुरुजी रेल्वे उड्डाणपुलावर दुचाकीचा कठड्याला जोरदार धक्का लागल्याने पुलाखाली पडून विजय भार्गव यांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून भार्गव कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

     मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील केशवनगर भागात राहणारे विजय भार्गव हे आपल्या मुलीसोबत दुचाकीवरून घरी जात असताना साने गुरुजी रेल्वे उड्डाणपुलावर त्यांच्या दुचाकीची कठड्याला जोरदार धडक बसली. या धडकेमुळे ते पुलाखाली पडून गंभीर जखमी झाले. घटनेची माहिती त्यांच्या पत्नीला मिळताच त्यांनी एका व्यक्तीच्या मदतीने विजय भार्गव यांना उपचारासाठी डॉ. अनिल शिंदे यांच्याकडे नेले. मात्र, गंभीर दुखापतीमुळे त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

    विजय भार्गव यांच्या मृत्यूची बातमी समजताच परिसरातील नागरिकांनी दवाखान्यात धाव घेतली. मृत भार्गव हे व्यवसायाने नामांकित ज्योतिषशास्त्रज्ञ होते. त्यांच्या आकस्मिक निधनाने परिसरात शोककळा पसरली आहे.

     दरम्यान, सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र यादव आणि राजू भालेराव यांनी या ठिकाणी यापूर्वीही दोन ते तीन व्यक्ती पुलावरून खाली पडून मृत्युमुखी पडल्याचे सांगितले. वारंवार घडणाऱ्या या दुर्घटना रोखण्यासाठी प्रशासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी त्यांनी केली आहे. पुलावर संरक्षण जाळी बसविणे, स्पीड ब्रेकर उभारणे तसेच वाहनचालकांना सावध करणारे हायलायटर व सूचना फलक लावणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.

     आणखी किती बळी गेल्यानंतर प्रशासन जागे होणार? असा सवाल उपस्थित करत नागरिकांनी या धोकादायक ठिकाणी तातडीने सुरक्षिततेच्या उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!