मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची अमळनेर काँग्रेसची मागणी….उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन; एस.आय.आर. प्रक्रियेतील कथित पक्षपातीपणावर आक्षेप

अमळनेर  : देशाचे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या कार्यपद्धतीवर आक्षेप घेत त्यांच्या राजीनाम्याची मागणी अमळनेर तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने करण्यात आली. सोमवार, दि. २८ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता उपविभागीय अधिकारी मयूर भंगाळे यांना यासंदर्भातील निवेदन देण्यात आले. यावेळी काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी घोषणाबाजी करत निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीचा निषेध नोंदवला.

तालुका काँग्रेस अध्यक्ष बी. के. सूर्यवंशी, मनोज पाटील, संदीप घोरपडे, सुलोचना वाघ आणि गजेंद्र साळुंखे यांनी निवेदनातील मागण्यांची माहिती दिली. मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरीक्षण (एस.आय.आर.) प्रक्रियेत मुख्य निवडणूक आयुक्तांकडून हुकूमशाही पद्धतीने आणि पक्षपातीपणे कामकाज होत असल्याचा आरोप त्यांनी केला.

निवेदनात म्हटले आहे की, मुख्य निवडणूक आयुक्तांसह सुखविंदर सिंग संधू आणि विवेक जोशी हेही निवडणूक प्रक्रियेत सहभागी आहेत. २०२३ च्या निर्णयानुसार महत्त्वाचे निर्णय एकमताने घेणे अपेक्षित असताना मुख्य निवडणूक आयुक्त मनमानी पद्धतीने काम करीत असल्याचा आरोप करण्यात आला. त्यांच्या कामकाजावर इतर दोन आयुक्तांनी दहा महिन्यांत १४ वेळा आक्षेप नोंदवल्याचेही काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी नमूद केले.

गोव्यातील ९७ पात्र मतदारांची नावे मतदार यादीत समाविष्ट करण्यासाठी इतर अधिकाऱ्यांनी नऊ वेळा ई-मेल पाठवूनही ही नावे समाविष्ट करण्यात आली नसल्याचा दावा निवेदनात करण्यात आला आहे. तसेच मतदार यादीतून मोठ्या प्रमाणावर नावे वगळली जात असल्याचा आरोप करत, या प्रक्रियेमुळे नागरिकांच्या मतदानाच्या अधिकारांवर परिणाम होण्याची भीती व्यक्त करण्यात आली

.काँग्रेसचे नेते राहुल गांधी, मल्लिकार्जुन खरगे आणि के. सी. वेणुगोपाल यांनीही ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी केल्याचे पदाधिकाऱ्यांनी सांगितले. उद्धव ठाकरे, अरविंद केजरीवाल आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यासह विविध विरोधी पक्षांच्या नेत्यांनीही एस.आय.आर. प्रक्रियेवर आक्षेप घेतल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले.

मतदार यादी तयार करण्याच्या प्रक्रियेत पारदर्शकता आणि निष्पक्षता असणे आवश्यक आहे. लोकशाहीत प्रत्येक पात्र नागरिकाला मतदानाचा अधिकार मिळणे महत्त्वाचे असून, मतदार यादीच्या पुनरीक्षण प्रक्रियेत मनमानी झाल्यास लोकशाही व्यवस्थेवरील विश्वासाला धक्का बसू शकतो, अशी भूमिका काँग्रेसने मांडली. मुख्य निवडणूक आयुक्तांच्या राजीनाम्याची मागणी सरकारपर्यंत पोहोचवावी, अशी विनंतीही उपविभागीय अधिकाऱ्यांना देण्यात आलेल्या निवेदनातून करण्यात आली.

यावेळी शरद पाटील, बन्सीलाल भागवत, कन्हैयालाल कापडे, हर्षल जाधव, रामकृष्ण पाटील, डॉ. रवींद्र पाटील, लोटन चौधरी, पार्थराज पाटील, पी. वाय. पाटील, सुधाकर भैसे, डॉ. प्रकाश सोनवणे, पितांबर पाटील, ताराचंद सूर्यवंशी, भास्कर बोरसे, राकेश पवार, राजेंद्र भिकन पाटील, शालिग्राम पाटील, भिकाजी पाटील, सुभाष शिंदे, दिलीप पाटील, प्रशांत पाटील, ज्ञानेश्वर पाटील आदी काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!