अमळनेर शहर प्रतिनिधी,माजी केंद्रीय मंत्री तथा शिक्षणमहर्षी ॲड. विजय नवल पाटील यांच्या ८४ व्या वाढदिवसानिमित्त आदर्श मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा सन्मान सोहळा अमळनेर येथील विजय पाटील आर्मी स्कूलमध्ये उत्साहात पार पडला. माजी शिक्षक आमदार डॉ. सुधीर तांबे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमात शिक्षण, संस्कार, शिस्त आणि सामाजिक बांधिलकी यावर मान्यवरांनी विचार व्यक्त केले.

कार्यक्रमास माजी शिक्षक आमदार दिलीप सोनवणे, राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कारप्राप्त सदानंद भावसार, प्रशासक प्रा. सुनील गरुड, प्रा. श्याम पवार, डी. बी. पाटील, राजू भालेराव, गणेश पवार, आदर्श सरपंच नरेंद्र पाटील, प्राचार्य डॉ. विजय उभाळे, डॉ. पी. पी. चौधरी, डॉ. एस. जे. शेख, मुख्याध्यापक बी. डी. पाटील आदी उपस्थित होते.
सदानंद भावसार यांनी शिक्षकांची भूमिका स्पष्ट करताना सांगितले की, “विद्यार्थ्यांना माहीत नसलेले शिकवणे म्हणजे शिक्षण नव्हे, तर विद्यार्थ्यांचे चारित्र्य घडवणारे शिक्षण देणे आवश्यक आहे.” शिक्षकांनी काळानुरूप अद्ययावत राहावे, विद्यार्थ्यांमध्ये मूल्यशिक्षण व संस्कार रुजवावेत आणि स्वतःचे आत्मपरीक्षण करावे, असे त्यांनी सांगितले. संस्कार केवळ शिकवता येत नाहीत, तर ते शिक्षकांच्या आचरणातून विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचतात. जीवनात वेळ, व्यवहार आणि शिस्त या त्रिसूत्रीबरोबरच आर्थिक शिस्त व सकारात्मक दृष्टिकोन आवश्यक असल्याचेही त्यांनी नमूद केले.
ग्राम विकास मंडळ सुवर्ण महोत्सव समितीचे डी. के. पवार यांनी नवलभाऊ पाटील यांच्या कार्याचा गौरव केला. १९७६ मध्ये त्यांनी ग्राम विकास मंडळाची स्थापना करून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना संधी उपलब्ध करून दिली. या संस्थेतून विद्यार्थी संसद सदस्यांपासून आयुक्त, पोलीस अधिकारी अशा विविध क्षेत्रांत कार्यरत झाले असल्याचे त्यांनी सांगितले.
माजी शिक्षक आमदार दिलीप सोनवणे यांनी कार्यक्रमाचे आयोजन हृदयस्पर्शी असल्याचे सांगत नानासाहेब विजय पाटील यांचे तब्बल ४० वर्षांपासूनचे कार्य जवळून अनुभवता आले असल्याचे नमूद केले. उत्तम संस्था चालक म्हणून नानासाहेबांचा लौकिक असल्याचेही त्यांनी सांगितले.
यावेळी माजी शिक्षक आमदार डॉ. सुधीर तांबे यांना देण्यात आलेल्या गौरवपत्राचे वाचन प्रा. डॉ. यू. वाय. गांगुर्डे यांनी केले.
अध्यक्षीय भाषणात डॉ. सुधीर तांबे यांनी शिक्षणव्यवस्थेतील विविध प्रश्नांवर भाष्य केले. “भारताच्या विकासाचा मार्ग शिक्षणातून जातो. जागतिक स्तरावरील दर्जेदार शिक्षणव्यवस्था भारतात रुजली तर देश विकसित होण्यास मोठी मदत होईल,” असे त्यांनी सांगितले. विद्यार्थ्यांनी भारतीय लष्कराच्या उच्च पदांवर जावे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
आजही अपेक्षित असा चांगला समाज निर्माण करण्यात आपण पूर्णपणे यशस्वी झालो नसल्याची खंत व्यक्त करत त्यांनी शिक्षणावरील सरकारी खर्च, परीक्षांमधील गैरप्रकार आणि शिक्षणविषयक धोरणांबाबत चिंता व्यक्त केली. चांगली शिक्षणव्यवस्था घडविण्याची ताकद शिक्षकांमध्ये असून शिक्षकांनी आपली भूमिका प्रभावीपणे बजावणे गरजेचे असल्याचे त्यांनी नमूद केले. सत्तेसाठी धार्मिक तेढ निर्माण होणे देशाच्या विकासासाठी घातक असल्याचे सांगत शिक्षणाला केंद्रस्थानी ठेवून सकारात्मक धोरण आखण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.

