कुशल विद्यार्थी घडविणाऱ्या प्राचार्य किरण बाविस्कर यांचा ‘आदर्श शिक्षक’ पुरस्काराने गौरव

सुनियोजन, वक्तशीरपणा व गुणवत्तापूर्ण शिक्षणातून विद्यार्थ्यांच्या यशात मोलाचे योगदान

अमळनेर : केंद्रीय मंत्री तथा शिक्षण महर्षी अॅड. विजय नवल पाटील यांच्या जन्मदिनानिमित्त, शिक्षक दिनाचे औचित्य साधून तसेच ग्रामविकास संस्थेच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त संस्थेअंतर्गत कार्यरत शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या उल्लेखनीय कार्याचा गौरव करण्यात आला. विजय पाटील आर्मी स्कूल येथे माजी शिक्षक आमदार डॉ. सुधीर तांबे यांच्या अध्यक्षतेखाली हा पुरस्कार सोहळा उत्साहात पार पडला.

या वेळी नवलभाऊ प्रतिष्ठान संचलित आयटीआयचे प्राचार्य श्री. किरण बाविस्कर यांच्या उल्लेखनीय शैक्षणिक कार्याची दखल घेत त्यांना ‘आदर्श शिक्षक पुरस्कार’ प्रदान करून सन्मानित करण्यात आले.

प्राचार्य किरण बाविस्कर हे गेल्या अनेक वर्षांपासून प्राचार्यपदाची जबाबदारी समर्थपणे सांभाळत आहेत. सुनियोजनबद्ध कार्यपद्धती, वक्तशीरपणा आणि विद्यार्थिकेंद्रित दृष्टिकोनातून त्यांनी संस्थेच्या शैक्षणिक प्रगतीत महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. विद्यार्थ्यांना तांत्रिक शिक्षणासोबतच शिस्त, कौशल्य आणि आत्मविश्वास मिळावा यासाठी ते सातत्याने प्रयत्नशील असतात. त्यांच्या मार्गदर्शनाखाली घडलेले अनेक विद्यार्थी विविध नामांकित आस्थापनांमध्ये कार्यरत असून आपल्या गुणवत्तेची व कौशल्याची छाप उमटवत आहेत.

या पुरस्कार सोहळ्यास माजी शिक्षक आमदार दिलीप सोनवणे, राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कारप्राप्त सदानंद भावसार, प्रशासक प्रा. सुनील गरुड, प्रा. श्याम पवार, डी. बी. पाटील, राजू भालेराव, गणेश पवार, आदर्श सरपंच नरेंद्र पाटील, प्राचार्य डॉ. विजय उभाळे, डॉ. पी. पी. चौधरी, डॉ. एस. जे. शेख, मुख्याध्यापक बी. डी. पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.

शैक्षणिक क्षेत्रातील सातत्यपूर्ण योगदानाची दखल घेत प्राचार्य किरण बाविस्कर यांना मिळालेल्या या पुरस्काराबद्दल त्यांचे विविध क्षेत्रांतून अभिनंदन होत आहे.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उमेश काटे यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!