२७ नोव्हेंबर ठरणार ‘बालविवाह निर्मूलन दिन’; आधार संस्थेकडून स्वागत

अमळनेर, दि. ५ सप्टेंबर : संयुक्त राष्ट्रसंघाने २७ नोव्हेंबर हा ‘बाल, अल्पवयीन आणि सक्तीच्या विवाह निर्मूलनासाठी आंतरराष्ट्रीय दिवस’ म्हणून घोषित केल्याच्या ऐतिहासिक निर्णयाचे आधार बहुउद्देशीय संस्था, अमळनेर यांनी स्वागत केले आहे.

बालविवाह निर्मूलनासाठी तळागाळात जनजागृती व प्रतिबंधात्मक कार्य करणारी आधार बहुउद्देशीय संस्था ही Just Rights for Children (JRC) नेटवर्कची भागीदार संस्था आहे. २७ नोव्हेंबर २०२४ रोजी भारतात ‘बाल विवाह मुक्त भारत’ अभियानाची सुरुवात झाली होती. आता याच दिवसाला आंतरराष्ट्रीय मान्यता मिळाल्याने बालविवाहविरोधी चळवळीला जागतिक बळ मिळाले असल्याचे संस्थेने म्हटले आहे.

“भारतातून निर्माण झालेला बालविवाह निर्मूलनाचा आवाज आज जागतिक संकल्प बनला आहे. मात्र, जागतिक घोषणेपुरते मर्यादित न राहता गावपातळीवर प्रत्यक्ष कृती करणे हीच खरी जबाबदारी आहे,” असे डॉ. भारती पाटील, रेणू प्रसाद आणि प्रा. डॉ. विजयकुमार वाघमारे यांनी सांगितले.

संस्थेमार्फत शाळा, ग्रामपंचायती आणि गावांमध्ये जनजागृती, बालविवाहविरोधी प्रतिज्ञा, जोखमीतील कुटुंबांना शासकीय योजनांशी जोडणे तसेच शिक्षणातून बाहेर पडलेल्या मुला-मुलींना पुन्हा शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

JRC च्या अभियानातून देशभरात बालविवाह रोखण्यासाठी मोठ्या प्रमाणावर जनजागृती करण्यात येत असून, संस्थेच्या माहितीनुसार ५ लाख ५० हजारांहून अधिक बालविवाह रोखण्यात योगदान मिळाले आहे.

या जागतिक निर्णयाच्या पार्श्वभूमीवर आधार बहुउद्देशीय संस्थेने पालक, शिक्षक, ग्रामपंचायत सदस्य, युवक, महिला, सामाजिक संस्था आणि शासकीय यंत्रणांनी एकत्र येऊन ‘बालविवाहमुक्त भारत’ घडविण्यासाठी पुढाकार घेण्याचे आवाहन केले. यावेळी आनंद पगारे, मोहिनी धनगर व सुनील हिवाळे उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!