पाणी फाऊंडेशन तर्फे अमळनेर मधील शेतकरी गटांचा झाला सन्मान…
अमळनेर,अजिंक्य तारा ग्रुप, सातारा व श्री.अंबरीश ऋषी महाराज टेकडी ग्रुप, अमळनेर यांना एकत्रित आमंत्रण आज डॉ. अविनाश पोळजी, पाणी फाउंडेशन यांच्या तर्फे दिले होते. आज बालेवाडी, पुणे येथील महाराष्ट्रातील शेतकरी गटांचा सत्कार करण्यात आला. यात अमळनेर येथील धरती माता महिला गट, पिंपळे खु, अमळनेर. यांचा तालुकास्तरीय प्रथम पारितोषिक देण्यात आले, या प्रसंगी पाणी फाउंडेशन समन्वयक सुनील पाटील व तुषार राऊत, टेकडी ग्रुप सदस्य आशिष चौधरी उपस्थितीत होते.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आज पुणे येथे ‘सत्यमेव जयते फार्मर कप पुरस्कार 2024 सोहळा’ संपन्न झाला. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी उपस्थितांना संबोधित केले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, सत्यमेव जयते फार्मर कप स्पर्धा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नेण्याचा श्रीगणेशा केल्याबद्दल आमीर खान यांचे आभार. महाराष्ट्रामध्ये 2015 पासून पाण्याचे जनआंदोलन सुरु झाले. राज्य शासनाने जलयुक्त शिवार योजना सुरु केली. कारण शाश्वत शेतीसाठी गावे जलसमृद्ध होणे आवश्यक आहे. जलयुक्त शिवार योजनेमुळे महाराष्ट्रामधील 20 हजार गावांनी स्वतःला जलपरिपूर्ण केले.2016 साली राज्य शासनाने गटशेती उपक्रमाची सुरुवात केली. आता महाराष्ट्रामध्ये गटशेतीचे मोठे आंदोलन उभे राहिले असून राज्य शासन गटशेतीचे नवे धोरण आणून गटशेती करणाऱ्यांना मदत करण्यासाठी प्रयत्न करणार आहे. तसेच राज्य शासनाने नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना सुरु केली आहे. याद्वारे जागतिक बँकेच्या साहाय्याने ₹4 हजार कोटींचा पहिला टप्पा पार केला. त्यावर जागतिक बँकेने समाधान व्यक्त करत ₹6 हजार कोटींचा दुसरा टप्पा दिला आहे. यामुळे शेतीमध्ये बदल झाला आहे.शेतीत गुंतवणूक वाढली पाहिजे, हा आमचा प्रयत्न आहे. अल्पभूधारक शेतकऱ्यांची संख्या 75% इतकी असल्याने त्यांना संपूर्ण यांत्रिकी शेती परवडू शकत नाही. गटशेती केल्याने शेतकऱ्यांची गुंतवणूक क्षमता वाढते. केपीएमजीच्या अहवालामध्ये गटशेती केल्याने उत्पादन खर्च कमी झाल्याचे व उत्पादकता वाढल्याचे स्पष्ट झाले. गटशेतीच्या माध्यमातून शेतकऱ्याच्या जीवनात परिवर्तन करु शकतो, शेती परवडणारी होऊ शकते, शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करु शकतो. शासनाने मागेल त्याला सौर कृषी पंप देण्याची योजना सुरु केली आहे. तसेच शेतकऱ्यांना 2026 पर्यंत 365 दिवस रात्रीऐवजी दिवसाच्या वेळी सोलर फिडरद्वारे वीज देण्यात येणार आहे. राज्य शासनाने गावातल्या प्राथमिक सोसायट्या या मल्टीपर्पज सोसायट्या व ऍग्री बिझनेस सोसायटीमध्ये कन्व्हर्ट करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे या सोसायट्यांना बाजारपेठ उपलब्ध होईल, साठवण व्यवस्था करता येईल. शासन शेतजमिनीच्या डिजिटायझेशनचे काम करत असल्याचे सांगितले. शेतीमध्ये एआयचा वापर करण्यासाठी राज्य शासनाने पुढाकार घेतला आहे, डिजिटल तंत्रज्ञानाद्वारे पीक व्यवस्थापनाचे काम करण्यात येणार आहे. 10 हजार गावामध्ये अमित चंद्रा यांच्या साहाय्याने गाळमुक्त धरण आणि गाळयुक्त शिवार योजनेचा काम सुरु आहे, असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले. डॉ. पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती मिशन राज्य शासनाने सुरु केले असून आता 25 लाख हेक्टरऐवजी 50 लाख हेक्टरवर या मिशनची अंमलबजावणी करण्याचे लक्ष्य ठेवले आहे. शेती, जलसंधारण अशा सर्व क्षेत्रात काम करणारी 1 लाख लोकांची फौज असून ही फौज सत्यमेव जयते फार्मर कप संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नेण्यासाठी पूर्ण मदत करेल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
यावेळी मंत्री माणिकराव कोकाटे, अभिनेता आमिर खान, निर्मात्या-दिग्दर्शिका किरण राव, भारतीय जैन संघटनेचे संस्थापक शांतीलाल मुथाजी व इतर मान्यवर उपस्थित होते
