अमळनेर येथील गांधली पुरा भागातील डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्या जवळ आणि गांधलीपुरा पोलिस ठाण्याच्या नजरेच्या टप्प्यावर असलेल्या वेश्याव्यवसाय बंद अथवा स्थलांतर करण्याच्या मागणीसाठी सर्व समाजाचा एल्गार पुकारण्याचा तयारीत,पत्रकार परिषदेत केले सुतोवाच.

सविस्तर वृत्त की, शहरातील गांधली पुरा नागरी वस्तीत अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या वेश्या व्यवसाया विरोधात सर्व समाजाच्या नागरिकांनी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी पुन्हा एकदा आवाज उठवला आहे. ७ मार्च रोजी अमळनेर शहरातील विविध सामाजिक, शैक्षणिक संघटनांच्या पुढाकाराने भव्य मोर्चा काढण्यात आला. रहिवाशांना होत असलेल्या त्रासाला वाचा फोडण्यासाठी आणि प्रशासनाने गांभीर्याने लक्ष घालावे यासाठी या आंदोलनाचे आयोजन करण्यात आले होते.

दिर्घकाळापासून सुरू असलेला संघर्ष…..
अमळनेरमधील गांधली पुरा परिसरात अनेक घरांमध्ये वेश्याव्यवसाय चालत असल्याची तक्रार स्थानिक रहिवाशांनी वेळोवेळी केली आहे. या व्यवसायामुळे परिसरातील नागरिकांना मानसिक, सामाजिक आणि आर्थिक समस्यांचा सामना करावा लागत आहे. विशेषतः लहान मुलांच्या भविष्यासाठी हा व्यवसाय घातक ठरत आहे. अनेक सामाजिक आणि राजकीय संघटनांनी यापूर्वीही आंदोलने करून हा व्यवसाय बंद करण्याची मागणी केली होती, मात्र अद्याप त्यावर ठोस कारवाई झालेली नाही.
न्यायालयाच्या आदेशाची पायमल्ली….?
याच पार्श्वभूमीवर सामाजिक कार्यकर्त्यांनी औरंगाबाद खंडपीठात क्रिमिनल पीटिशन 598/2019 दाखल केली होती. या याचिकेवर ९ ऑक्टोबर २०२४ रोजी दोन न्यायमूर्तींच्या खंडपीठाने आदेश दिला होता. मात्र, त्या आदेशाची अंमलबजावणी अद्याप झालेली नाही, अशी आंदोलनकर्त्यांची तक्रार आहे.
प्रशासनाने त्वरित पावले उचलावीत – मागण्या स्पष्ट
पत्रकात परिषदेत सर्व समाजाच्या कार्यकर्त्यांनी प्रशासनासमोर काही प्रमुख मागण्या ठेवल्या आहेत. या मागण्यांमध्ये पुढील मुद्दे महत्त्वाचे ठरले:
1. आंदोलनकर्त्यांना संरक्षण द्यावे – वेश्या व्यवसाय चालवणाऱ्यांकडून धमक्या मिळत असल्याने याचिकाकर्ते आणि रहिवाशांना पोलीस संरक्षण द्यावे.
2. वेश्या व्यवसाय पूर्णतः बंद करावा – पोलीस प्रशासनाने गांधली पुरा परिसरात गस्त घालून वेश्या व्यवसायावर कायमस्वरूपी बंदी आणावी.
3. सीसीटीव्ही कॅमेरे बसवावे – अमळनेर नगरपरिषदेने परिसरात कार्यक्षम सीसीटीव्ही यंत्रणा बसवावी.
4. महिला व बालकल्याण विभागाने हस्तक्षेप करावा – वेश्याव्यवसायात अडकलेल्या महिलांचे समुपदेशन करावे आणि त्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी मदत करावी.
5. अल्पवयीन मुलींवर होणाऱ्या अन्यायास आळा घालावा – काही दलाल अल्पवयीन मुलींना जबरदस्तीने या व्यवसायात ढकलतात. याविरोधात कठोर कारवाई करावी.
6. गुन्हेगारी प्रवृत्ती रोखावी – वेश्याव्यवसायाच्या आड गांजा, नकली दारू आणि इतर अवैध धंदे सुरू असल्याने परिसरातील महिला आणि मुली असुरक्षित आहेत.
7. आतापर्यंत किती कारवाई झाली याचा अहवाल जाहीर करावा – पीटा कायद्यांतर्गत आतापर्यंत पोलिसांनी कोणकोणत्या कारवाया केल्या आहेत याची सविस्तर माहिती प्रशासनाने द्यावी.
8. परिसरातील कुटुंबांवर होणारे परिणाम टाळावेत – वेश्याव्यवसायामुळे रहिवाशांच्या मुला-मुलींच्या विवाहात अडथळे निर्माण होत आहेत, घटस्फोटाच्या संख्येत वाढ होत आहे.
प्रशासन आणि राजकीय नेत्यांच्या भूमिकेवर सवाल ?
या व्यवसायातून आर्थिक फायद्याचे गणित साधणाऱ्या काही गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांना राजकीय आश्रय असल्याचा आरोपही आंदोलकांनी केला आहे. विशेषतः काही लोकप्रतिनिधी समाजात संभ्रम निर्माण करण्यासाठी महिलांचे मेळावे घेत असल्याचा आरोप करण्यात आला. या मेळाव्यांमध्ये प्रशासकीय अधिकारी सहभागी होत असल्याने, उच्च न्यायालयाच्या आदेशाला डावलले जात असल्याचे आंदोलकांचे म्हणणे आहे.
अनैतिक व्यापार प्रतिबंध कायदा १९५६ नुसार :—
कलम ३- सदर कायद्याच्या कलम ३ नुसार जागेचा, घराचा, हॉटेलचा वेश्यागृह चालविण्यासाठी करण्यात येणाऱ्या वापराबद्दल कमीत कमी १ वर्षे आणि जास्तीत जास्त ३ वर्षाची शिक्षा आणि रू.२०००/- पर्यंत दंडाची तरतूद आहे.
कलम ४– सदर कायद्याच्या कलम ४ नुसार वेश्या व्यवसाय करायला लावून त्या कमाईवर जगणारे संबंधीत मुलीचे पालक, मॅडम, तिला ठेवणारी घरवाली, भडवा यांना ७ ते १० वर्षे सक्त मजुरीच्या शिक्षेची तरतुद आहे.
कलम ५- सदर कायद्याच्या कलम ५ नुसार वेश्या व्यवसायासाठी महिलेस अगर बालिकेस वेश्या व्यवसाय करायला लावणाऱ्या घर मालकास ७ ते १४ वर्षापर्यंत सक्त मजुरीची तरतुद आहे.
कलम ६- सदर कायद्याच्या कलम ६ नुसार वेश्या व्यवसाय सुरू असलेल्या ठिकाणी महिलेस,बालिकेस, बालकास डांबून ठेवले आणि त्याच्याकडील चीजवस्तू काढून घेतल्यास ७ ते १० वर्षांपर्यंत सक्तमजुरीची शिक्षा आहे.
कलम ७– सदर कायद्याच्या कलम ७ नुसार शाळा, मंदिरे, होस्टेल, हॉस्पिटल, नर्सिंग होम,त्यांच्या जवळपास कोणी वेश्या व्यवसाय केल्यास ३ महिन्याच्या शिक्षेची तरतूद आहे.
कलम ८- सदर कायद्याच्या कलम ८ नुसार शब्दांनी अगर खाणाखुणांनी, दरवाजा, खिडकी,बाल्कनीत उभे राहून वेश्या व्यवसायाचा प्रचार, प्रसार आणि आकृष्ठ करून घेण्याचा प्रयत्न केल्यास १ वर्षापर्यंतची शिक्षा, ५०० रू. दंडाची तरतूद आहे.
कलम ९– सदर कायद्याच्या कलम ९ नुसार वेश्या व्यवसायाबाधीत व्यक्तीचा वापर, त्याचा ताबा असणाऱ्या व्यक्ती अथवा यंत्रणेस पुन्हा त्यास मानवी व्यापार करायला लावल्यास ७ ते १० वर्षाची शिक्षा होवू शकते.
कलम १२ – सदर कायद्याच्या कलम १२ नुसार बाधीत व्यक्ती अथवा चांगल्या वर्तणुकीची हमी दिलेल्या व्यक्तीस सुरक्षितता देण्यात यावी.
कलम १३ – सदर कायद्याच्या कलम १३ नुसार विशेष अधिकारी आणि समिती गठीत करण्यात यावी.
कलम १५ – सदर कायद्याच्या कलम १५ नुसार पोलीस अधिकाऱ्यास वॉरंट शिवाय कोणत्याही इमारत, घराचा शोध घेता येईल.
कलम १६— सदर कायद्याच्या कलम १६ नुसार बाधीत व्यक्तींना वेश्यागृहातून बाहेर काढून कोर्टासमोर हजर करण्यासाठी पोलीस अधिकाऱ्याला मॅजिस्ट्रेटइतके अधिकार आहेत.
कलम १७ – सदर कायद्याच्या कलम १७ नुसार कुठल्याही कोर्टासमोर हजर करता येईल.
कलम १८ – सदर कायद्याच्या कलम १८ नुसार वेश्यागृह बंद करण्यासाठी विविध सूचना देण्यात आल्या आहेत.
कलम १९ – सदर कायद्याच्या कलम १९ नुसार दक्षतागृह, संरक्षण गृह, आधारगृहामध्ये बाधीत व्यक्तीला ठेवण्याचे आदेश घेता येतील.
कलम २० – सदर कायद्याच्या कलम २० नुसार वेश्या व्यवसाय करणारी महिलेस नोटीस देऊन संबंधीत जागेवर पुन्हा न दिसण्याची ताकीद देता येते.
कलम २१ – सदर कायद्याच्या कलम २१ नुसार बाधीत महिलांसाठी प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी संरक्षण गृह, आधार गृह असणे आवश्यक आहे.
कलम २२ – सदर कायद्याच्या कलम २२ नुसार प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांच्याकडे गुन्हे दाखल करता येतील.
कलम २२(ए) – सदर कायद्याच्या कलम २२ (ए) नुसार गुन्हे जादा असतील तर स्वतंत्र विशेष न्यायालय उभारण्यात येतील.
कलम २३ – सदर कायद्याच्या कलम २३ नुसार आपापल्या राज्यात विशेषत निर्णय करता येतील.उच्च न्यायालयाच्या न्या. रंजना देसाई आणि न्या. डी. बी. भोसले यांच्या खंडपीठाने वर नमूद केल्याप्रमाणे भक्कम कायदा असूनही अनैतिक व्यापार प्रतिबंधक कायद्याचे नीट अंमलबजावणी होण्यासाठी महाराष्ट्र सरकारला महत्त्वपूर्ण सूचना दिल्या आहेत त्या पुढीलप्रमाणे; अनैतिक व्यापार प्रतिबंधक समिती जिल्हा निहाय त्वरित गठीत करण्यात यावेत.
*+++++++++++++++++++++++++++*
आंदोलनकर्त्यांची पुढील भूमिका:—-
या विषयाला अधिक व्यापक रूप देण्यासाठी आणि जनतेमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी आंदोलक संघटनांनी पुढील टप्प्यात व्यापक जनजागृती मोहिमा राबवण्याचा निर्णय घेतला आहे. जर प्रशासनाने त्वरीत कारवाई केली नाही, तर आणखी तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्याचा इशारा कार्यकर्त्यांनी दिला आहे.
पत्रकार परिषदेत उपस्थित मान्यवर :–
या मोर्चात रियाज मौलाना, अशोक पवार, संदीप घोरपडे, बन्सीलाल भागवत,बी के सूर्यवंशी, कुदरत अली, नावेद शेख, रिझवान मण्यार, शेरखा पठाण, मनोज मोरे, सोमचंद संदानशिव,अर्जुन संदानशिव, धनराज पारधी, इक्बाल कुरेशी,राजू चंडाळे, अब्दुल गफार खाटीक आदी मान्यवर उपस्थित होते.
गांधली पुरा परिसरातील रहिवाशांच्या सुरक्षिततेसाठी आणि समाजातील नैतिकता जपण्यासाठी हा लढा सुरूच राहील, असे आंदोलनकर्त्यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले आहे. आता प्रशासन या मागण्यांवर काय निर्णय घेते, याकडे संपूर्ण अमळनेर शहराचे लक्ष लागून आहे.
