‘मातीचा गणपती, पर्यावरणाची खरी भक्ती’; अमळनेरात तालुकास्तरीय शाडू माती गणपती कार्यशाळा व स्पर्धा

अमळनेर : पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा संदेश जनमानसात पोहोचविण्यासाठी जयनिल फाउंडेशन, अमळनेर यांच्या वतीने तालुकास्तरीय शाडू माती गणपती कार्यशाळा व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ‘मातीचा गणपती, पर्यावरणाची खरी भक्ती’ हा संदेश घेऊन आयोजित या उपक्रमातून विद्यार्थ्यांसह नागरिकांना पर्यावरण संवर्धनाची प्रेरणा दिली जाणार आहे.

ही कार्यशाळा रविवार, ६ सप्टेंबर रोजी सकाळी १० ते दुपारी २ वाजेपर्यंत मराठा मंगल कार्यालय, अमळनेर येथे होणार आहे. कार्यशाळेत सहभागी विद्यार्थ्यांना शाडू मातीपासून स्वतः गणपतीची मूर्ती साकारण्याचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. प्लास्टर ऑफ पॅरिसच्या (पीओपी) मूर्तींमुळे होणारे जलप्रदूषण टाळून पर्यावरणपूरक गणेशोत्सवाची संकल्पना नव्या पिढीपर्यंत पोहोचविणे हा उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे.

दोन गटांत होणार स्पर्धा

स्पर्धेसाठी बाल गट (इयत्ता १ ली ते ७ वी) आणि खुला गट (वयाची अट नाही) असे दोन गट करण्यात आले आहेत. दोन्ही गटांमध्ये प्रथम क्रमांकासाठी ३ हजार रुपये, द्वितीय क्रमांकासाठी २ हजार रुपये आणि तृतीय क्रमांकासाठी १ हजार रुपये अशी रोख बक्षिसे देण्यात येणार आहेत.

विशेष म्हणजे, स्पर्धेत सहभागी होणाऱ्या प्रत्येक विद्यार्थी व प्रशिक्षणार्थीला प्रशस्तीपत्रक देण्यात येणार आहे.

जयनिल फाउंडेशनचे अध्यक्ष गौतम जयश्री अनिल पाटील व उपाध्यक्ष वरुण राजश्री राजेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. पर्यावरणपूरक गणेशोत्सवाची संस्कृती रुजविणाऱ्या या उपक्रमात जास्तीत जास्त विद्यार्थी, पालक आणि गणेशभक्तांनी आपल्या मुलांसह सहभागी व्हावे, असे आवाहन जयनिल फाउंडेशन, अमळनेर यांच्या वतीने करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!