अमळनेर : अमळनेर शहरातील ढेकू परिसरातील राजर्षी शाहू महाराज सर्कल येथे गेल्या १० वर्षांपासून लावण्यात आलेल्या छत्रपती शाहू महाराजांच्या फलकावर, रिलायन्स जिओ स्मार्ट बाजार कंपनीने अनधिकृतपणे आपली जाहिरातबाजी केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या कृत्यामुळे बहुजन समाजाच्या भावना तीव्रतेने दुखावल्या असून, संबंधित कंपनीवर तात्काळ गुन्हा दाखल करावा, अशी मागणी करत राजमुद्रा फाउंडेशनने प्रशासनाला निवेदन दिले आहे.

नेमका प्रकार काय?
आरक्षणाचे जनक आणि बहुजन समाजाला न्याय-हक्क मिळवून देणारे राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या सन्मानार्थ ढेकू परिसरातील सर्कलवर राजमुद्रा फाउंडेशनच्या वतीने गेल्या दशकभरापासून एक फलक लावण्यात आला आहे. मात्र, गेल्या १५ दिवसांपासून रिलायन्स जिओ स्मार्ट बाजार, अमळनेर या व्यावसायिक कंपनीने या फलकावर बेकायदेशीरपणे स्वतःचा जाहिरात फलक लावला. महापुरुषाच्या प्रतिमेवर अशा प्रकारे जाहिरातबाजी करून कंपनीने त्यांचा घोर अवमान केला असल्याचा आरोप केला जात आहे.
गुन्हा दाखल करण्याची मागणी
या बेजबाबदार आणि अपमानकारक कृत्यामुळे अमळनेरसह संपूर्ण परिसरात बहुजन समाजात तीव्र संताप व्यक्त होत आहे. राजमुद्रा फाउंडेशनचे अध्यक्ष शाम जयवंतराव पाटील यांनी या प्रकरणी प्रशासनाला निवेदन देऊन जिओ स्मार्ट बाजारच्या स्थानिक शाखेवर आणि जबाबदार प्रशासकांवर कडक कायदेशीर कारवाई करत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.
“महापुरुषांचा अवमान कोणत्याही परिस्थितीत सहन केला जाणार नाही. व्यावसायिक फायद्यासाठी शाहू महाराजांच्या फलकावर अनधिकृत जाहिरातबाजी करणाऱ्या जिओ स्मार्ट बाजारवर तात्काळ गुन्हा दाखल होऊन न्याय मिळावा.”— शाम जयवंतराव पाटील (अध्यक्ष, राजमुद्रा फाउंडेशन)
