माहेरचा पारिजात’ स्नेहमेळा : अमळनेरच्या माहेरवाशिणींनी लुटला निसर्गभ्रमण, दर्शन व खेळांचा आनंद

अमळनेर : अमळनेर महिला मंच ट्रस्टतर्फे आयोजित आणि श्री मंगळग्रह सेवा संस्थेच्या सहकार्याने सुरू असलेल्या ‘माहेरचा पारिजात’ या तीन दिवसीय स्नेहमेळ्याच्या दुसऱ्या दिवशी (दि. ३०) माहेरवाशिणींनी विविध उपक्रमांचा मनमुराद आनंद घेतला.

​पहाटे संतश्री सखाराम महाराज रोपवाटिकेत फेरफटका मारत महिलांनी पक्ष्यांचे विविधांगी जग अनुभवले, योगासने केली व श्री मंगळग्रहाची आरती केली. त्यानंतर नीम येथील तापी-पांझरा-लुप्त गंगा संगमावरील कपिलेश्वर महादेवांचे दर्शन घेऊन भजने सादर केली व निसर्गाच्या सान्निध्यात भोजनाचा आस्वाद घेतला.

​दुपारी मंगळग्रह मंदिरात सागरगोटे, काचा-कवड्या, लगोरी, संगीतखुर्ची यांसारखे पारंपरिक खेळ, सायंआरती, मिमिक्रीसह विविध गुणदर्शन आणि रात्री शेकोटीभोवती नृत्य-गायनाचा आनंद महिलांनी लुटला. याप्रसंगी मंचच्या अध्यक्षा कांचनताई शहा, उपाध्यक्षा तिलोत्तमाताई पाटील, सरोजताई भांडारकर, सचिव वसुंधराताई लांडगे, कोशाध्यक्षा प्रा. शीलाताई पाटील यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. सोमवारी (दि. ३१) सकाळी ओटी भरून या स्नेहमेळ्याचा समारोप होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!