क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या अंमळनेर तालुका अध्यक्षपदी संदीप सैंदाणे तर जळगाव जिल्हा उपाध्यक्षपदी प्रकाश बोरसे यांची निवड

अमळनेर : क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष रविकांत तुपकर आणि जळगाव जिल्हाध्यक्ष शरद विनायक पाटील यांच्या आदेशानुसार अमळनेर तालुका व जळगाव जिल्हा कार्यकारिणीच्या महत्त्वपूर्ण नियुत्त्या जाहीर करण्यात आल्या आहेत. संघटनेच्या अमळनेर तालुका अध्यक्ष पदी संदीपजी बबनराव सैंदाणे (भैय्यासाहेब) तर जळगाव जिल्हा उपाध्यक्षपदी प्रकाश बोरसे यांची बिनविरोध व बहुमताने निवड करण्यात आली आहे

जिल्हाध्यक्ष शरद पाटील यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देऊन या सर्व पदाधिकाऱ्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.

नवनियुक्त तालुका अध्यक्ष संदीप (भैय्यासाहेब) सैंदाणे हे स्वतः शेतकरी असून त्यांना बळीराजाच्या समस्या आणि प्रश्नांची सखोल जाण आहे. यापूर्वीही त्यांनी शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी, अन्यायाविरोधात आणि न्याय्य हक्कांसाठी अनेक लढाया यशस्वीपणे लढल्या आहेत. त्यांचा शेतकऱ्यांप्रती असलेला जिव्हाळा, तळमळ आणि संघर्ष करण्याची वृत्ती लक्षात घेऊनच त्यांच्यावर अमळनेर तालुका अध्यक्षपदाची मोठी जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

स्वतः शेतकरी असलेल्या आणि प्रत्यक्ष बांधावर उतरून काम करणाऱ्या संदीप सैंदाणे यांची तालुका अध्यक्षपदी निवड झाल्याने शेतकरी वर्गातून आणि जनमानसातून अत्यंत सकारात्मक प्रतिक्रिया उमटत आहेत. “योग्य व्यक्तीच्या हाती योग्य नेतृत्व आले आहे,” अशी भावना स्थानिक शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.

या नियुक्ती सोहळ्याप्रसंगी जिल्हा उपाध्यक्ष प्रकाश बोरसे, तालुका अध्यक्ष संदीप सैंदाणे यांच्यासह संघटना बांधणीसाठी कटिबद्ध असलेले विजय पाटील, मनोज पाटील ठाकूर आणि क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे अनेक प्रमुख कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!