अमळनेरकरांना मोठा दिलासा:  मुख्य जलवाहिनीची युद्धपातळीवर दुरुस्ती; शहराचा पाणीपुरवठा अखेर पूर्ववत!….प्रशासनाचे अहोरात्र श्रम, लोकप्रतिनिधींचे प्रयत्न आणि शहरवासीयांच्या संयमाचे फळ

अमळनेर : गत ३१ जुलै रोजी आलेल्या भीषण पुरामुळे शहराची मुख्य जलवाहिनी वाहून गेली होती. परिणामी, संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा ठप्प होऊन अमळनेरकरांचे मोठे हाल होत होते. नागरिकांची ही गंभीर समस्या ओळखून नगरपरिषद प्रशासनाने तातडीने युद्धपातळीवर दुरुस्तीचे काम हाती घेतले. अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या अहोरात्र परिश्रमानंतर ही मुख्य जलवाहिनी पूर्ववत जोडण्यात यश आले असून शहराचा पाणीपुरवठा सुरळीत सुरू झाला आहे.

वरिष्ठांचे मार्गदर्शन व लोकप्रतिनिधींचा प्रत्यक्ष सहभाग

सदर दुरुस्तीचे काम आमदार श्री. शिरीषदादा चौधरी, लोकनियुक्त नगराध्यक्ष डॉ. परीक्षित बाविस्कर आणि मुख्याधिकारी श्री. गणेश शिंदे यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली पूर्ण करण्यात आले.

पाणीपुरवठा सभापती कैलासतात्या पाटील, उपाध्यक्ष प्रशांत निकम, पंकज चौधरी, नवीद शेख, श्रीराम चौधरी, अनिल महाजन, दादा पवार, तुळशीराम हटकर, सुरजभाऊ परदेशी, पंकज भोई, दीपक चौघुले, नाना धनगर, मुन्नाभाऊ शर्मा, मोहन सातपुते यांच्यासह सर्वपक्षीय नगरसेवक, सामाजिक कार्यकर्ते योगराज संदानाशिव यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी उपस्थित राहून कामाला गती दिली.

तांत्रिक पथकाचे शर्थीचे प्रयत्न

   मोठे आव्हान असताना पाणीपुरवठा अभियंता सत्यम पाटील, विजय विसावे, कमोरोद्दीन शेख यांच्यासह नगरपरिषदेच्या तांत्रिक कर्मचारी वर्गाने दिवस-रात्र एक करत दुरुस्ती पूर्ण केली. पाणीपुरवठा सुरू होताच शहरवासीयांनी सुटकेचा निःश्वास टाकत समाधान व्यक्त केले.

प्रशासनाकडून नागरिकांचे आभार

संकटकाळात नागरिकांनी दाखवलेला संयम आणि केलेल्या सहकार्याबद्दल नगराध्यक्ष डॉ. परीक्षित बाविस्कर व सभापती कैलासतात्या पाटील यांनी अमळनेरकरांचे मनापासून आभार मानले. “नागरिकांना मूलभूत सुविधा देण्यासाठी नगरपरिषद प्रशासन सदैव कटिबद्ध असून भविष्यातही अशा आपत्कालीन स्थितीत तत्परतेने काम केले जाईल,” असा विश्वास प्रशासनाने व्यक्त केला.

थोडक्यात पण महत्त्वाचे:

पत्रकार बांधवांची करडी नजर, नागरिकांची संयमी भूमिका, विरोधकांचा प्रशासनावर असलेला तगादा, सत्ताधारी गटाचे अथक प्रयत्न आणि न.पा. कर्मचाऱ्यांचे अहोरात्र श्रम… या सर्वांच्या समन्वयाचेच हे फलित ठरले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!