शासकीय कर्मचाऱ्यांवरील हल्ले अत्यंत निषेधार्ह; दोषींवर कठोर कारवाई करा: अमळनेर तालुका राजपूत एकता मंचाचे प्रांताधिकाऱ्यांना निवेदन

अमळनेर : शासकीय कर्तव्य बजावत असताना ग्रामसेवक आणि महापालिकेच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांवर झालेले प्राणघातक हल्ले अत्यंत संतापजनक व निषेधार्ह आहेत. या घटनांमधील दोषींवर तात्काळ कठोर कारवाई करण्यात यावी, या मागणीसाठी अमळनेर तालुका राजपूत एकता मंचाच्या वतीने प्रांताधिकारी मयूर भंगाळे यांना नुकतेच निवेदन देण्यात आले.

दोन गंभीर घटनांचा निवेदनात उल्लेख

निवेदनात नमूद केले आहे की, जळगाव जिल्ह्यातील शिवरे (ता. पारोळा) येथे ग्रामसभेदरम्यान शासकीय कर्तव्य पार पाडत असलेले ग्रामसेवक प्रल्हाद पाटील (वय ५२) यांना काही ग्रामस्थांनी मारहाण केली. यावेळी स्वतःचा जीव वाचवण्यासाठी पळत असताना त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.

तसेच अहिल्यानगर (अहमदनगर) शहरातील मुकुंदनगर परिसरात महापालिकेचे कंत्राटी कर्मचारी धीरज कचरुसिंग परदेशी (वय ३१) हे ७ ऑगस्ट रोजी पथदिव्यांची दुरुस्ती करत असताना त्यांच्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला.

मंचाची ठाम मागणी

“कर्तव्य बजावणाऱ्या कर्मचाऱ्यांचे संरक्षण करणे ही शासनाची प्राथमिक जबाबदारी आहे,” अशी भूमिका मांडत राजपूत एकता मंचाने या घटनांची गांभीर्याने दखल घेण्याची मागणी केली आहे. राजपूत समाजातील दोन्ही पीडित कुटुंबांना लवकरात लवकर न्याय मिळवून देण्यासाठी प्रशासनाने तातडीने पावले उचलावीत आणि भविष्यात अशा घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी ठोस उपाययोजना कराव्यात, अशी ठाम मागणी करण्यात आली. अशा भ्याड हल्ल्यांमुळे कर्मचारी व त्यांच्या कुटुंबीयांच्या सुरक्षिततेचा प्रश्न तर निर्माण होतोच, शिवाय प्रशासकीय कामकाजावरही गंभीर विपरीत परिणाम होतो, असे मंचाने म्हटले.

पदाधिकाऱ्यांची मोठी उपस्थिती

प्रांताधिकारी मयूर भंगाळे यांनी हे निवेदन स्वीकारले. यावेळी अमळनेर तालुका राजपूत एकता मंचाचे अध्यक्ष रणजित पाटील, अनिल पाटील, चेतन राजपूत, जयराम पाटील, विलास पाटील, जयदीप पाटील, डॉ. ज्ञानेश्वर शिंदे, अमोल राजपूत, कुणाल गिरासे, भोजराज राजपूत, दिलीप पाटील, रोहिदास पाटील, विक्रम पाटील, सुनील पाटील, गणेश पाटील, प्रकाश पाटील, समाधान धनगर, अजयसिंग पाटील, आशिष राजपूत, भरतसिंग पाटील यांच्यासह मंचाचे अनेक पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!