अमळनेर हादरले: बाजरी काढताना उष्माघाताचा तडाखा; पातोंडा येथील तरुण मजुराचा दुर्दैवी मृत्यू …….मृताच्या कुटुंबावर कोसळला दु:खाचा डोंगर; शासकीय मदतीची ग्रामस्थांकडून मागणी

     अमळनेर : तालुक्यातील पातोंडा येथे काळजाचा थरकाप उडवणारी एक दुर्दैवी घटना घडली आहे. मंगळवारी भरदुपारी शेतात बाजरी काढण्याचे काम करत असताना उष्माघाताचा तीव्र झटका बसल्याने रघुनाथ वाल्हे (वय-अंदाजे ४०) या कष्टकरी तरुण मजुराचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत असून, वाल्हे कुटुंबाचा आधार हिरावला गेल्याने मोठी पोकळी निर्माण झाली आहे.

पातोंडा येथील रहिवासी असलेले रघुनाथ वाल्हे हे अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत मोलमजुरी करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते. सध्या शेतीकामांचे दिवस असल्याने ते धान्य काढणीच्या मशीनवर मजूर म्हणून काम करत होते. मंगळवारी दुपारी ते नेहमीप्रमाणे शेतकरी देविदास पाटील यांच्या शेतात बाजरी काढण्याचे काम करत होते. दुपारच्या सुमारास तापमानाचा पारा वाढलेला असताना, काम करत असतानाच त्यांना अचानक त्रास होऊ लागला. उष्माघाताची तीव्रता इतकी मोठी होती की, उपचारापूर्वीच त्यांची प्राणज्योत मालवली.

रघुनाथ वाल्हे हे आपल्या कुटुंबातील एकमेव कमावते पुरुष होते. हाताला मिळेल ते काम करून ते आपल्या पत्नी, दोन मुले आणि मुलीचा सांभाळ करत होते. त्यांच्या अकाली निधनाने कुटुंबाचा आधार तर गेलाच आहे, पण आता मुलांचे शिक्षण आणि उदरनिर्वाहाचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. ऐन उमेदीच्या काळात कर्ता पुरुष गेल्याने वाल्हे कुटुंबावर आता उपासमारीची वेळ येऊन ठेपली आहे.

नैसर्गिक आपत्तीप्रमाणेच उन्हाच्या तीव्रतेने एका कष्टकऱ्याचा बळी घेतल्याने पातोंडा ग्रामस्थांनी तीव्र संताप आणि दुःख व्यक्त केले आहे. शासनाने या घटनेची गांभीर्याने दखल घेऊन, पीडित कुटुंबाला तातडीने आर्थिक मदत जाहीर करावी, अशी आग्रही मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.

“रघुनाथ अत्यंत कष्टाळू माणूस होता. उन्हातान्हात मेहनत करून तो कुटुंब चालवत होता. सरकारने त्याच्या कुटुंबाला वाऱ्यावर न सोडता आर्थिक मदतीचा हात द्यावा.”

— एड प्रशांत संदानशिव, ग्रामस्थ, पातोंडा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!