‘शून्य अपघात’ मोहीम अंतर्गत अमळनेरात नियमभंग करणाऱ्या ५० वाहनांवर कारवाई, ५४ हजारांचा दंड वसूल

अमळनेर : शहरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत राखण्यासाठी आणि अपघातांचे प्रमाण शून्यावर आणण्यासाठी अमळनेर वाहतूक शाखेने शहरात विशेष तपासणी मोहीम राबवली. विविध ठिकाणी लावलेल्या नाकाबंदीदरम्यान मोटार वाहन कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या ५० वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली असून त्यांच्याकडून एकूण ५४ हजार ७०० रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे.

​जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या ‘शून्य अपघात’ संकल्पनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी उपविभागीय पोलीस अधिकारी (डीवायएसपी) विनायक कोते व पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. वाहतूक पोलीस हेडकॉन्स्टेबल संजय बोरसे, रवींद्र बोरसे आणि संजय सोनवणे यांच्या पथकाने गलवाडे रस्ता, नाट्यगृह परिसर, भागवत रस्ता तसेच धुळे रस्ता आदी प्रमुख मार्गांवर नाकाबंदी करून सुमारे ८० ते ९० वाहनांची कसून तपासणी केली.

​कारवाईचा तपशील व दंड :

​अवैध वाहन परवाना : ४ चालकांवर सर्वाधिक २०,००० रुपये दंड.

​अयोग्य पार्किंग : सार्वजनिक ठिकाणी चुकीच्या पद्धतीने लावलेल्या १९ वाहनांवर १२,००० रुपये दंड.

​ट्रिपल सीट प्रवास : ६ वाहनचालकांवर ६,००० रुपये दंड.

​विनाहेल्मेट प्रवास : ५ वाहनचालकांवर ५,००० रुपये दंड.

​मोबाईलवर बोलणे : वाहन चालवताना फोन वापरणाऱ्या ५ जणांवर ५,००० रुपये दंड.

​इतर नियमभंग : रिफ्लेक्टर नसलेली ३ वाहने (३,००० रु.),

परवान्याशिवाय वाहन चालवणारे २ चालक (१,००० रु.),

तुटलेली नंबर प्लेट असलेली २ वाहने (१,००० रु.),

जादा प्रवासी वाहतूक, काळी काच/फ्रेम, कर्कश सायलेन्सर असलेली बुलेट आणि पोलिसांच्या सूचनेकडे दुर्लक्ष करणाऱ्या प्रत्येकी एका वाहनावर प्रत्येकी ५०० रुपये दंड आकारण्यात आला.

​या कारवाईतील सर्व प्रकरणांचा अहवाल पुढील कार्यवाहीसाठी न्यायालयात पाठविण्यात आला आहे. शहरातील वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी आणि नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी ही विशेष मोहीम यापुढेही अशीच तीव्र स्वरूपात सुरू राहणार असल्याचा इशारा वाहतूक पोलिसांनी दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!