अमळनेर : शहरातील मातोश्री नगर परिसरात अज्ञात चोरट्यांनी एका बंद घराला लक्ष्य करत सुमारे ३५ ते ४० ग्रॅम सोन्याचे दागिने आणि ४० हजार रुपयांची रोख रक्कम लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे.
मातोश्री नगरातील चामुंडा माता मंदिराजवळ राहणारे युगल जगदीश वैष्णव हे कामानिमित्त बाहेरगावी गेले होते. त्यांच्या अनुपस्थितीचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी घराचा दरवाजा व कुलूप तोडून आत प्रवेश केला. घरातील लॉकर उघडून चोरट्यांनी सोन्याची माळ, १० ग्रॅमची चैन, बांगड्या असा एकूण ३५ ते ४० ग्रॅम वजनाचा सोन्याचा ऐवज व ४० हजार रुपयांची रोख रक्कम चोरून नेली.
घटनेची माहिती मिळताच अमळनेर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. या प्रकरणी तक्रारदार युगल वैष्णव यांनी तात्काळ तपासाची मागणी केली असून, पोलीस परिसरातील सीसीटीव्ही फुटेज, बोटांचे ठसे व तांत्रिक पुराव्यांच्या आधारे अज्ञात चोरट्यांचा कसून शोध घेत आहेत. या धाडसी चोरीमुळे परिसरात नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.