जानवे येथे बंद घर फोडून ३६ हजारांचे सोन्या-चांदीचे दागिने लांबवले; अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल

अमळनेर :  तालुक्यातील जानवे येथे अज्ञात चोरट्यांनी बंद घराचे कुलूप तोडून घरात प्रवेश करत ३६ हजार रुपये किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी अमळनेर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

​मिळालेल्या माहितीनुसार, जानवे येथील रहिवासी सुरेश गोबा पाटील (वय ७०, व्यवसाय: शेती) हे ६ ऑगस्ट २०२६ रोजी रात्री ८:३० वाजेच्या सुमारास जेवण करून पत्नी छायाबाई यांच्यासह घराच्या वरच्या मजल्यावर झोपण्यासाठी गेले होते. त्यांचा मुलगा राहुल हा देखील रात्री ११:३० वाजेच्या सुमारास कामावरून घरी आल्यानंतर घराला कुलूप लावून वरच्या मजल्यावर झोपायला गेला.

​दिनांक ७ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ५:३० वाजेच्या सुमारास सुरेश पाटील यांच्या पत्नी छायाबाई खाली गेल्या असता त्यांना घराच्या मुख्य दरवाजाचे कुलूप तोडलेले दिसले. त्यांनी आरडाओरड केल्यानंतर सर्वांनी खाली येऊन पाहिले असता पहिल्या रुममधील सामान अस्ताव्यस्त पडलेले होते. तसेच मागील रुममधील लाकडी कपाटाचे ड्रॉवर उघडून त्यातील कापडी पाकीटात ठेवलेले सोन्या-चांदीचे दागिने गायब असल्याचे निष्पन्न झाले.

​याप्रकरणी सुरेश पाटील यांच्या फिर्यादीवरून अमळनेर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३३१(३), ३३१(४) व ३०५(अ) अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली हेकॉ/१९९८ मिलिंद सोनार पुढील तपास करत आहेत.

​चोरीस गेलेल्या दागिन्यांचा तपशील:

​सोन्याची झुमके (५ ग्रॅम): ₹ १०,०००/-

​सोन्याची अंगठी (५ ग्रॅम): ₹ १०,०००/-

​सोन्याची काप (३ ग्रॅम): ₹ ६,०००/-

​चांदीची साखळी (१० भार): ₹ ५,०००/-

​चांदीची पैंजण (५ भार): ₹ २,५००/-

​चांदीची कंबरची साखळी/कंबरपट्टा (५ भार): ₹ २,५००/-

​एकूण किंमत: ₹ ३६,०००/-

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!