प्रताप महाविद्यालयात ‘नशामुक्त युवा व सायबर सुरक्षा’ जनजागृतीपर व्याख्यान संपन्न

अमळनेर: येथील प्रताप महाविद्यालय (स्वायत्त) मधील राष्ट्रीय सेवा योजना (NSS) विभाग आणि अमळनेर पोलीस ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने “नशामुक्त युवा फॉर – विकसित भारत” आणि सायबर सुरक्षा या अभियानांतर्गत विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते.

​कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. हर्षवर्धन जाधव होते. उपविभागीय पोलीस अधिकारी (डीवायएसपी) विनायक कोते आणि पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांनी मुख्य मार्गदर्शक म्हणून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

​मार्गदर्शनातील मुख्य मुद्दे:

​व्यसनमुक्तीचे आवाहन: डीवायएसपी विनायक कोते यांनी अमली पदार्थांच्या दुष्परिणामांवर प्रकाश टाकत युवकांनी क्रीडा, योग व अभ्यासाकडे वळून निरोगी जीवनशैली स्वीकारावी, असे आवाहन केले.

​सायबर सुरक्षेचे धडे: डिजिटल अटक, ओटीपी फ्रॉड आणि एआयच्या (AI) गैरवापरापासून सावध राहण्याचे सांगत गोपनीय माहिती कोणाशीही शेअर करू नये, असा सल्ला देण्यात आला.

​तात्काळ मदतीसाठी हेल्पलाइन: सायबर फसवणूक झाल्यास १९३० आणि इतर कोणत्याही आपत्कालीन प्रसंगी ११२ या टोल-फ्री क्रमांकांवर त्वरित संपर्क साधण्याचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांनी स्पष्ट केले.

​प्राचार्य डॉ. जाधव यांनी विद्यार्थ्यांना तंत्रज्ञानाचा वापर जबाबदारीने करण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. सुनील राजपूत यांनी तर आभार प्रदर्शन डॉ. जयेश साळवे यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!