अमळनेर येथे ९ ऑगस्टला केंद्र व राज्य सरकारविरोधात निघणार भव्य ‘मशाल मोर्चा’; विविध संघटनांचा पाठिंबा

अमळनेर: केंद्र आणि राज्य सरकारच्या धोरणांचा जाहीर निषेध नोंदवण्यासाठी क्रांती दिनाचे औचित्य साधून ९ ऑगस्ट २०२६ रोजी सायंकाळी ७ वाजता अमळनेर येथील तिरंगा चौकात भव्य ‘मशाल मोर्चा’ आयोजित करण्यात आला आहे. “१२ वर्षांत साऱ्यांचे १२ वाजविले” या घोषणेखाली हा मोर्चा काढला जाणार आहे.

​महागाई, बेरोजगारी, शिक्षणाचा झालेला शोषक कारभार, वाढता भ्रष्टाचार, शेतकरी व विद्यार्थ्यांच्या समस्या तसेच कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न यांसारख्या विविध १२ मुद्द्यांवर सरकारचे लक्ष वेधण्यासाठी या मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.

​मोर्चातील प्रमुख मागण्या:

​बैलेट पेपरवर निवडणुका: ई.व्ही.एम. मशीनऐवजी बॅलेट पेपरवर मतदान घेण्यात यावे.

​शेतकऱ्यांना मदत व हमीभाव: पीक विमा योजनेतील पीक कापणी प्रयोगाचा निकष रद्द करून शेतमालाला योग्य हमीभाव द्यावा.

​अतिवृष्टीग्रस्तांना तात्काळ भरपाई: अमळनेर येथील अतिवृष्टीग्रस्तांना तात्काळ ५० हजार रुपयांची मदत मिळावी व शहर आणि ग्रामीण भागात नुकसानीचे त्वरित पंचनामे करावेत.

​आरोग्य व स्वच्छता: अमळनेर शहरात स्वच्छता मोहीम राबवून पिण्याचे शुद्ध पाणी व वैद्यकीय व्यवस्था सज्ज ठेवावी.

​पाडळसरे धरणासाठी निधी: पाडळसरे धरणासाठी दरवर्षी ५०० कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात यावा.

​या विशाल मशाल मोर्चामध्ये महाविकास आघाडी, मराठा सेवा संघ, मुस्लिम युथ सेवा फाउंडेशन, संभाजी ब्रिगेड, भारत मुक्ती मोर्चा, एन.एस.यु.आय. विद्यार्थी संघटना, निवृत्त सेवा संघटना, पुरोगामी क्रांती दल, प्रहार संघटना आणि साने गुरुजी कर्मभूमी स्मारक प्रतिष्ठान (अमळनेर) या संघटनांनी नागरिकांना मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!