​”संसार पुन्हा उभा राहिल!”; अमळनेरच्या पूरग्रस्तांच्या पाठीशी सरकार खंबीर, जलवाहिनीसाठी निधीची हमी

अमळनेर: बोरी नदीला ३१ जुलै रोजी आलेल्या भीषण महापुरामुळे अमळनेर शहर आणि तालुक्यात मोठे नुकसान झाले आहे. शेकडो घरांमध्ये पाणी शिरल्याने संसार उद्ध्वस्त झाले असून, शहराची मुख्य जलवाहिनी वाहून गेल्याने पाणीपुरवठा पूर्णपणे ठप्प झाला आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीष महाजन, पालकमंत्री गुलाबराव पाटील आणि आमदार अनिल पाटील यांनी जिल्हाधिकाऱ्यांसह पूरग्रस्त भागाची प्रत्यक्ष पाहणी करून नागरिकांना धीर दिला.

​तात्काळ मदतीत वाढ: पूर्वीच्या ५ हजार रुपयांऐवजी आता प्रत्येक पूरग्रस्त कुटुंबाला १० हजार रुपयांची तातडीची मदत दिली जाईल, अशी घोषणा मंत्री गिरीष महाजन यांनी केली.

​पाणीपुरवठा पूर्ववत करणार: वाहून गेलेल्या मुख्य जलवाहिनीच्या पुनर्रचनेसाठी डीपीडीसी (DPDC) च्या माध्यमातून निधी उपलब्ध करून देऊन पाणीपुरवठा लवकरात लवकर सुरळीत करण्याचे आश्वासन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिले.

​अतिक्रमणांवर कारवाईचे आदेश: पिंपळे नाल्यावरील अतिक्रमणांमुळे पुराची तीव्रता वाढल्याचे निदर्शनास येताच, अशा अतिक्रमणांवर तात्काळ कारवाई करण्याचे कडक निर्देश प्रशासनाला देण्यात आले.

​व्यापारी आणि फोटोग्राफर्सना पाठबळ: बाजार समितीतील नुकसानग्रस्त व्यापारी आणि दुकानांमध्ये पाणी शिरल्याने आर्थिक फटका बसलेल्या फोटोग्राफर्सना विशेष मदत देण्याबाबत सकारात्मक पावले उचलली जातील.

​सामाजिक संस्थांचे कौतुक: पुराच्या वेळी जीव धोक्यात घालून नागरिकांना वाचवणाऱ्या आणि अन्न-पाणी पुरवणाऱ्या ‘जयनिल फाऊंडेशन’सह इतर सामाजिक संस्थांच्या कार्याचा मंत्र्यांनी विशेष गौरव केला.

​”कोणताही पात्र नागरिक मदतीपासून वंचित राहणार नाही. सर्व प्रकारच्या नुकसानीचे पंचनामे तातडीने व पारदर्शक पद्धतीने पूर्ण करून मदत जलदगतीने वितरीत केली जाईल.”

— गिरीष महाजन (जलसंपदा मंत्री)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!