अमळनेर कृषी उत्पन्न बाजार समितीचा स्तुत्य उपक्रम: तालुक्यातील शासकीय व निमशासकीय कार्यालयांना स्व. अजितदादा पवारांच्या प्रतिमांचे वाटप

अमळनेर : महाराष्ट्र शासनाच्या परिपत्रकानुसार स्वर्गीय लोकनेते अजितदादा पवार यांची जयंती सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालये तसेच संस्थांमध्ये अधिकृतपणे व आदराने साजरी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. या परिपत्रकाची अमलबजावणी सुलभ व्हावी आणि सर्व कार्यालयांमध्ये स्व. अजितदादांची प्रतिमा सन्मानाने स्थापित करता यावी, या उद्देशाने अमळनेर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अशोक पाटील यांच्या पुढाकाराने तालुक्यातील सर्व कार्यालयांना प्रतिमेची सप्रेम भेट देण्याचा स्तुत्य उपक्रम राबवण्यात येत आहे.

लोकनेते अजितदादा पवार यांनी महाराष्ट्राच्या विकासात, कृषी क्षेत्रात, प्रशासनात तसेच अमळनेर तालुक्यातील महत्त्वपूर्ण अशा पाडळसरे धरणासह इतर विकासकामांमध्ये दूरदृष्टीने दिलेले अमूल्य योगदान सदैव स्मरणात राहील, असा भावना या वेळी व्यक्त करण्यात आल्या.

या उपक्रमाची सुरुवात करताना सभापती अशोक आधार पाटील यांनी अमळनेर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी एन. आर. पाटील, तहसीलदार रूपेशकुमार सुराणा, प्रांताधिकारी कार्यालय, तसेच प्रभारी गटशिक्षणाधिकारी प्रमोद पाटील यांना प्रत्यक्ष भेटून प्रतिमा सुपूर्द केली. याप्रसंगी अमळनेर अर्बन बँकेचे संचालक रणजित शिंदे व इतर सहकारी उपस्थित होते.

तालुक्यातील सर्व प्रमुख अधिकारी, मुख्याध्यापक, संस्थाचालक, शासकीय व निमशासकीय कार्यालये, शाळा, महाविद्यालये, प्राथमिक आरोग्य केंद्र आणि ग्रामपंचायत कार्यालयांना ही प्रतिमा भेट म्हणून उपलब्ध करून देण्यात आली आहे. संबंधितांनी ही प्रतिमा स्वीकारून शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार जयंतीचा कार्यक्रम अत्यंत उत्साहात व आदराने संपन्न करावा, अशी अपेक्षा व्यक्त करणारे पत्रही सभापती अशोक पाटील यांनी दिले आहे. बाजार समितीच्या आणि सभापतींच्या या उपक्रमाचे सर्व स्तरातून विशेष कौतुक होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!