गुन्हेगारांवर जरब, पीडितांना न्याय! जळगाव जिल्हा पोलिसांची २०२६ मध्ये ‘सुपर परफॉर्मन्स’ कामगिरी; राज्यात नावलौकिक

जळगाव: गुन्हे उघडकीस आणणे, गंभीर गुन्ह्यांमध्ये गुन्हेगारांना दोषसिद्धी (Conviction) मिळवून देणे, संघटित गुन्हेगारीचा बिमोड करणे आणि महिला-बालकांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देणे, अशा सर्वच आघाड्यांवर जळगाव जिल्हा पोलीस दलाने सन २०२६ मध्ये अत्यंत उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे. आपल्या कर्तव्यदक्षतेने कायदा व सुव्यवस्था अबाधित राखत जळगाव पोलिसांनी संपूर्ण महाराष्ट्रात जिल्ह्याचा नावलौकिक उंचावला आहे.

या उत्कृष्ट कामगिरीबद्दल सेवा बजावणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचा विशेष गौरव करण्यात आला असून डिजिटल पोलिसिंगमध्येही जिल्ह्याने राज्यात पाचवा क्रमांक पटकावला आहे.

⚖️ ‘बेस्ट कन्व्हिक्शन’ पुरस्काराने अधिकारी व अभियोक्ते सन्मानित

गंभीर गुन्ह्यांचा काटेकोर तपास करून आणि न्यायालयात भक्कम पुरावे सादर करून आरोपींना कठोर शिक्षा मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या खालील पथकाला ‘बेस्ट कन्व्हिक्शन’ पुरस्काराने गौरविण्यात आले:

पोलीस निरीक्षक: कावेरी कमलाकर नेम

पोलीस उपनिरीक्षक: जितेंद्र वल्टे व राजेंद्र साळुंखे

पोलीस हवालदार: बिजू फत्तू जावरे

विशेष सरकारी अभियोक्ता: ॲड. सुरेंद्र काबरा

सहाय्यक सरकारी अभियोक्ता: ॲड. सुनिलकुमार चोरडिया

🚨 ‘या’ संवेदनशील प्रकरणांमध्ये आरोपींना झाली कठोर शिक्षा:

१. चोपडा शहर बलात्कार व खून प्रकरण: १३ वर्षीय बालिकेवरील अत्याचार व खून प्रकरणात उत्कृष्ट तपासामुळे आरोपीस मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा झाली.

२. रावेर चार मुलांची हत्या कांड: अत्यंत संवेदनशील असलेल्या या प्रकरणात अज्ञात आरोपीचा शोध घेऊन भक्कम पुराव्यांच्या आधारे न्यायालयाने नराधम आरोपीस फाशीची शिक्षा सुनावली.

३. नशिराबाद पोक्सो (POCSO) गुन्हे: पोक्सो अंतर्गत दाखल गुन्ह्यात आरोपीस २० वर्षे सश्रम कारावास व दंडाची शिक्षा मिळवून देण्यात यश आले.

🔬 फॉरेन्सिक टीमचे वैज्ञानिक यश

एरंडोल येथे अर्धवट जळालेल्या अज्ञात महिलेच्या मृतदेहाची ओळख पटवून खुनाचा क्लिष्ट गुन्हा उघडकीस आणण्यात फॉरेन्सिक पथकाचे मोलाचे योगदान राहिले. डॉ. यशस्वी तायडे, डॉ. निकिता अधिकने आणि डॉ. जितेंद्रसिंग राजपूत यांच्या वैज्ञानिक तपासामुळे या गुंतागुंतीच्या प्रकरणाला निर्णायक दिशा मिळाली.

🔫 विशेष मोहिमा आणि गुन्हेगारीवर प्रहार

मुक्ताईनगर कॉम्बिंग ऑपरेशन: या धडक मोहिमेत ६ गुन्हे दाखल करून २ गावठी कट्टे, १७ मोबाईल, ३८ लाखांचे सोन्या-जांदीचे दागिने, २० लाख ४२ हजार ९०० रुपयांची रोकड आणि हरणाचे कातडे जप्त करत ५ संशयितांना ताब्यात घेण्यात आले.

एटीएम चोरीचा थरार: जळगाव शहरातील एटीएम चोरीच्या गुन्ह्यात अवघ्या काही वेळातच ४ आरोपींना बेड्या ठोकून ७ लाख रुपये हस्तगत केले.

भुसावळ खून प्रकरण: कोणताही प्रत्यक्ष साक्षीदार किंवा तांत्रिक पुरावा नसताना केवळ ‘व्हिडिओ विश्लेषणाच्या’ (Video Analysis) आधारे गुन्हा उघडकीस आणला.

जिल्हापेठ हत्यार जप्ती: गोपनीय माहितीच्या आधारे कारवाई करत ११ गावठी कट्टे, १२ काडतुसे आणि ८ तलवारींसह ८ आरोपींना अटक केली.

👩‍शाळकरी महिला व बालसुरक्षा: ‘भरोसा’, ‘दामिनी’ आणि ‘काका-दिदी’ उपक्रम

भरोसा सेल: हजारो अर्ज निकाली काढत अनेक कुटुंबांमध्ये समेट घडवून आणला.

दामिनी पथक: शाळा-महाविद्यालय परिसरात सातत्याने गस्त घालून विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेसाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या.

पोलीस काका-दिदी उपक्रम: विद्यार्थिनींना ‘गुड टच – बॅड टच’ तसेच वैयक्तिक सुरक्षेबाबत थेट मार्गदर्शन केले.

सायबर सुरक्षा प्रशिक्षण: सायबर गुन्ह्यांपासून बचावासाठी जिल्ह्यातील ८ ते १० हजार विद्यार्थ्यांना सायबर सुरक्षेचे विशेष प्रशिक्षण देण्यात आले.

💻 डिजिटल पोलिसिंगमध्ये ‘जळगाव’ टॉप ५ मध्ये!

माहिती तंत्रज्ञानाचा वापर करत CCTNS प्रणालीमध्ये जळगाव जिल्ह्याने महाराष्ट्रात पाचवा क्रमांक मिळवून डिजिटल पोलिसिंगमध्ये छाप पाडली आहे. यासोबतच अंगुली मुद्रा (Fingerprint) शाखा आणि डॉग स्कॉडने शेकडो घटनास्थळांना भेटी देऊन तपासाला गती दिली.

इतर उल्लेखनीय कामगिरी:

मोटार परिवहन विभाग: विभागातील एका चालकाने ३८ वर्षे अपघातमुक्त सेवा बजावत आदर्श कार्याचा ठसा उमटविला.

वाहतूक शाखा: आग लागलेल्या १०८ रुग्णवाहिकेच्या घटनेत वाहतूक पोलिसांनी प्रसंगावधान राखून परिसर सुरक्षित केला व संभाव्य मोठा अनर्थ टाळला.

सन २०२६ मधील या सर्व अष्टपैलू कामगिरीमुळे जळगाव जिल्हा पोलीस दलाने केवळ गुन्हेगारांवर प्रभावी अंकुश ठेवला नाही, तर सामान्य नागरिकांचा पोलिसांवरील विश्वास अधिक दृढ केला आहे. जळगाव पोलीस हे “कार्यक्षम, तत्पर आणि जनतेच्या सुरक्षेसाठी कटिबद्ध” असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!